भामरागड तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका – हेमलकसा-लाहेरी मार्गावरील वाहतूक ठप्प….

गडचिरोली, दिनांक:-26 सप्टेंबर 2025 (प्रतिनिधी)
गेल्या दोन दिवसांपासून भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली–भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130 डी वरील भामरागड–पर्लकोट दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून हेमलकसा–लाहेरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी हा मार्ग बंद पडतो. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच व्यापारी वर्गाला प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. या रस्त्यालगतच्या गावांमध्ये जाण्या-येण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत असून त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा कालावधी व खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दरम्यान, या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत मंद आहे. काम पूर्णत्वास न गेल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) कामातील झालेला विलंब आणि निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्हा हा डोंगराळ आणि अतिवृष्टीप्रवण असल्याने अशा प्रकारचे अडथळे सातत्याने निर्माण होत असतात. मात्र, हेमलकसा–लाहेरी हा मार्ग आरोग्य, शिक्षण, शेतीमालाची वाहतूक तसेच माओवादी प्रभावित भागातील शासकीय कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरवर्षीच्या पुनरावृत्ती होणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाढू लागली आहे.