# आपत्कालीन परिस्थितीत समन्वयासाठी आयआरएस प्रणाली लागू* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

आपत्कालीन परिस्थितीत समन्वयासाठी आयआरएस प्रणाली लागू*

प्रशासनाची पूरस्थितीवर बारीक नजर* *सिरोंचा तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 20 ऑगस्ट 2025

मान्सूनच्या कालावधीत अतिवृष्टी आणि नद्यांच्या पातळीतील वाढ यामुळे संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गडचिरोली जिल्ह्यात आयआरएस (Incident Response System- घटनांवरील प्रतिसाद प्रणाली) प्रणाली लागू केली आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदर आदेश जारी केले आहे, यासोबतच पूरपरिस्थिती नियंत्रणात असली तरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी या प्रमुख नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने पाणलोट क्षेत्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारी वाढवून उपाययोजना सुरू केल्या आहेत. आयआरएस प्रणालीनुसार पूरस्थितीत विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. यानुसार

 धरण, नदी आणि तलावांचा दर तासाने डेटा अद्ययावत करून तांत्रिक विश्लेषण करणे व समन्वय राखणे.
बंद झालेले रस्ते व संपर्क तुटलेल्या गावांची माहिती अद्ययावत करणे, बॅरिकेड्स लावणे आणि अडथळे दूर करणे.
विद्युत पुरवठा आणि दूरसंचार सेवा खंडित झालेल्या गावांची माहिती गोळा करून तातडीने दुरुस्ती करणे.
गॅस, पेट्रोल, भाजीपाला आणि अन्नधान्य यांचा पुरवठा सुरळीत ठेवणे.आरोग्य व्यवस्था कार्यान्वित ठेवून साथरोग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करणे.सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून निर्जंतुकीकरणाची सोय करणे.पूरग्रस्त नागरिकांना शेल्टर होममध्ये स्थलांतरित करून मूलभूत सुविधा पुरविणे.पूरस्थितीचे दैनिक अहवाल तयार करणे घरे, शेती आणि शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणे.

*सिरोंचा तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात*

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याची पातळी संथ गतीने वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काल रात्री तेलंगानातून वाढलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी तातडीने एनडीआरएफचे पथक पाठविण्यासाठी नागपूर येथे पत्र दिले. त्याची तातडीने दखल घेण्यात येवून नागपूरहून काल रात्रीच 10 वाजता पथक पाठवण्यात आले होते. सकाळी 5 वाजता सिरोंचा येथे दाखल झालेल्या पथकाने गोदावरी, प्राणहिता आणि मेडीगट्टा धरणाची पाहणी केली आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून, तलाठी, ग्रामसेवक आणि आपत्ती मित्रांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवारागृहे तयार ठेवण्यात आली असून अद्याप स्थलांतराची आवश्यकता निर्माण झालेली नाही. तथापि, तालुका प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
0000

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!