युवा महोत्सवाच्या आयोजनाचा अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा;*
*जास्तीत जास्त युवकांना सहभागी होण्याचे आवाहन!*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025
युवकांना आपली कला, कौशल्ये आणि नवकल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर युवा महोत्सव २०२५-२६ सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी दिले.
६ नोव्हेंबर २०२५ रोजी येथील जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी आज घेतला. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, या प्रमुख उद्दिष्टांनी हा महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र युवक-युवतींना मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे आणि जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या महोत्सवात १२ जानेवारी २०२६ या तारखेनुसार १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतील. जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ आणि विविध युवक मंडळे यात भाग घेऊ शकतात. तसेच, सहभागी युवक गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असावा. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, काव्य लेखन, नवोपक्रम ट्रॅक (विज्ञान प्रदर्शन) आणि ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’ यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’चा उद्देश कृषी, कौशल्य विकास, शासकीय व्यवस्था यांसारख्या क्षेत्रातील आव्हानांवर अभिनव उपाययोजना सुचवण्यासाठी युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे.
सहभागी होण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाने भारत सरकारच्या My Bharat पोर्टलवर (mybharat.gov.in) नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज (सांघिक व वैयक्तिक) आणि ओळखपत्र ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे किंवा ईमेलद्वारे (dsogad2@gmail.com) जमा करावे लागतील. या महोत्सवात प्राविण्य मिळवणाऱ्या संघ/कलाकारांना विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सवात (१० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे) सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच, प्रत्येक स्तरावर यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके देखील दिली जातील, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी दिली आहे.
बैठकीला आयोजन समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.



