चंद्रपूरचा कोहिनूर लंडनमध्ये उजळणार!”
विदर्भ न्यूज 24 – विशेष संपादकीय मुख्य संपादक:- संदीप राचर्लावार

विशेष संपादकीय विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 16 ऑगस्ट 2025
राजकारण आणि समाजकारण या दोनही क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे, संवेदनशीलतेने व दूरदृष्टीने काम करणारे नाव म्हणजेच आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार. सतत लोकांसाठी झटणारे, चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरवणारे आणि महाराष्ट्रात वित्त, वने, सांस्कृतिक कार्य या महत्त्वाच्या खात्यांचा ठसा उमटवणारे हे लोकनेते. आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे.
१८ ऑगस्ट रोजी लंडनमध्ये होणाऱ्या *‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’*मध्ये लोकमत समूह तर्फे सुधीरभाऊंना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. हे केवळ वैयक्तिक यश नाही, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी, विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधून भारतात आणण्याचा ऐतिहासिक पराक्रम ज्यांच्या नावावर नोंदला गेला, त्या भूमीतच सुधीरभाऊंना ‘कोहिनूर’ हा मान मिळणे, हा एक विलक्षण योगायोग आहे. या सन्मानातून त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
लोकमत समूहाने गेल्या दोन वर्षांपासून ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ या व्यासपीठातून जागतिक अर्थव्यवस्थेवरील चर्चेला चालना दिली आहे. भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत सुधीरभाऊंनी मांडलेले विचार, त्यांची धोरणात्मक मांडणी आणि अर्थकारणातील अनुभव जागतिक स्तरावर झळकणार आहे.
सुधीरभाऊंच्या कार्याचा मागोवा घेतला तर पुरस्कारांची मोठी परंपरा दिसते—गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा मानाचा डी.लिट., लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टुडेद्वारे बेस्ट फायनान्स मिनिस्टर, गिनेस व लिम्का रेकॉर्ड, विक्रमी वृक्षलागवडीसाठी पंतप्रधान मोदींनी केलेला ‘मन की बात’मधील विशेष गौरव, देशातील पहिल्या ISO दर्जाचा मंत्री कार्यालय अशा असंख्य कामगिरींनी सुधीरभाऊंना ओळख दिली आहे.
राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता, समाजपरिवर्तनाचे शस्त्र म्हणून वापरणाऱ्या नेत्यांच्या यादीत मुनगंटीवारांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांचे भाषण असो वा अर्थसंकल्पातील भक्कम मांडणी—सामान्य नागरिकांपर्यंत ते सहज भिडतात. म्हणूनच आज चंद्रपूरचा हा ‘कोहिनूर’ लंडनच्या व्यासपीठावर उजळणार आहे.
हा पुरस्कार केवळ एका नेत्याचा सन्मान नसून, चंद्रपूरच्या जनतेच्या विश्वासाचा, विदर्भाच्या प्रगतीच्या आकांक्षांचा आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वशक्तीच्या सामर्थ्याचा गौरव आहे.
- –– विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
- विदर्भ न्यूज 24 – विशेष संपादकीय मुख्य संपादक:- संदीप राचर्लावार। 9421729671,9423502555
- ✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com