महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून सेवा पंधरवाडा उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल*
*नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्याच्या सूचना*

गडचिरोली, विदर्भ न्यूज-24 नेटवर्क दिनांक:-19/09/2025
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपापल्या तक्रारी व निवेदने सादर केली. प्राप्त तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्रीद्वयांनी जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपवनसंरक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय देत अनेक तक्रारींचे निवारण जागेवरच करण्यात आले.
एका प्रकरणात ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधीत तक्रारीचे निपटारा करण्यात झालेल्या दिरंगाईची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून वेतनवाढी रोखण्यासाठी शिफारस करण्याच्या सूचना दिल्या. “अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले असते तर नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात आज इथे यावे लागले नसते. अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारी वेळेवर सोडवाव्यात,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, संजय आसवले तसेच सर्वश्री अशोक नेते, डॉ. देवराव होळी, रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.