# सागवान तस्करीवर आसरअल्ली वन विभागाची मोठी कारवाई – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाविशेष वृतान्त

सागवान तस्करीवर आसरअल्ली वन विभागाची मोठी कारवाई

तेलंगाना तस्करांच्या रॅकेटवर आळा – १० सागवान ओंडके, वाहनासह ६.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:– 04 सप्टेंबर 2025
सिरोंचा तालुक्यातील आसारअल्ली परिक्षेत्रात पुन्हा एकदा सागवान तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. तेलंगाना राज्यात अवैध विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या १० सागवान ओंडक्यांसह एक वाहन वन विभागाने जप्त केले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

— तस्करीवर अचूक सापळा

कोपेला–सोमनपल्ली जंगल क्षेत्रातून सागवान तोडून तेलंगानात नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने बुधवारी मध्यरात्री विशेष सापळा रचला. पहाटे ४ वाजताच्या सुमारास आसारअल्ली–पातागुडम मार्गावर तेलंगाना क्रमांकाचे संशयास्पद वाहन दिसले. थांबविण्याचा प्रयत्न करताच वाहनचालकाने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र सतर्क वन अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यात यश मिळवले.

जप्त वाहन क्रमांक TS-12/UB-3262 असून, त्याची किंमत ५ लाख रुपये तर लाकडाची किंमत १.२८ लाख रुपये इतकी आहे.

— आरोपी अटकेत

अटक केलेल्या आरोपीचे नाव रमेश सत्यनारायण कैरोजू (रा. आजमनगर, जि. भोपालपल्ली, तेलंगाना) असे असून, चौकशीत त्याने लाकूड तेलंगानात विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे. घटनेवर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६(१) अंतर्गत गुन्हा नोंदवून एफआयआर क्र. ०७/२०२५ दाखल केला आहे. पुढील न्यायालयीन कारवाई सुरू आहे.

कारवाईत सहभागी पथक

श्री. एस. जी. सुरपाम – वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), आसारअल्लीश्री. व्ही. आर. गोल्लेवार – क्षेत्र सहाय्यक,श्री. बी. के. पाडदे – वनरक्षक,श्री. ए. जी. दोनाडकर – वनरक्षकश्री. ए. आर. नरोटे – वनरक्षक,श्री. व्ही. जी. रंदये – वनरक्षक,कु. एस. सी. वेलादी – वनरक्षक,श्री. कन्नाके – वाहनचालक
तसेच रोजंदारी मजूर

मार्गदर्शन व भूमिका

या कारवाईला मा. एस. नवकिशोर रेड्डी (IFS), उपवनसंरक्षक सिरोंचा व मा. अक्षय मीणा (IFS), उपविभागीय वन अधिकारी सिरोंचा यांचे मार्गदर्शन लाभले

–⚠️ पार्श्वभूमी – सागवान तस्करीचा वाढता धोका

गेल्या काही दशकांत सिरोंचा व आसारअल्ली जंगलपट्ट्यातील ८० टक्के सागवान तस्करीमुळे नामशेष झाला आहे. कधीकाळी ‘जंगलातील सोने’ म्हणून ओळखला जाणारा हा सागवान देशभरात मोठ्या मागणीमुळे तस्करांच्या विळख्यात अडकला. उरलेला वीस टक्के सागवानही मागील काही महिन्यांपासून पुन्हा तेलंगाना तस्करांच्या नजरेस पडला असून मोठ्या प्रमाणात अवैध तोड व वाहतूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर अलीकडील कारवाई ही केवळ एक जप्ती नसून, जंगल संपत्ती व जैवविविधता वाचविण्याच्या लढ्यातील एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

या कारवाईमुळे सागवान तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला असला, तरी वन विभागासमोर अजूनही मोठे आव्हान उभे आहे. स्थानिक व तेलंगाना तस्करांचा वाढता दबाव थोपविण्यासाठी सततच्या कारवाया व जनसहभाग आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker