विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शिस्त रूजविणे ही काळाची गरज — केंद्रप्रमुख राजु आत्राम यांचे मार्गदर्शन

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 12 डिसेंबर 2025
समूह साधन केंद्र बोरी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपूर पॅच येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख राजू आत्राम होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक लक्ष्मी कुसराम, प्रकाश दुर्गे, पुणम सिडाम, परिषदेच्या सुलभक कु. शैलजा गोरेकर व डॉ. आत्माराम तोंडे यांचा समावेश होता.
परिषदेत मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख आत्राम व शैलजा गोरेकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांना प्रेमाने आपलेसे करत त्यांच्या मनात सकारात्मक शिस्त निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. हेच विद्यार्थी भविष्यात आदर्श नागरिक होणार असल्याने त्यांना शाळेतून योग्य संस्कार देणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.”
अलीकडील काळात शाळांमध्ये शिक्षेबाबत घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षा करणे दंडनीय असून त्यामुळे मुलांमध्ये भीती, न्यूनगंड निर्माण होऊ शकतो व त्यांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधत, समुपदेशन करून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिस्तप्रिय वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे शैलजा गोरेकर यांनी सांगितले.
परिषदेत निपुण महाराष्ट्र, अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक उपक्रम, शाळांमध्ये मूल्यवर्धन अभियानाची अंमलबजावणी, तसेच नवोदय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा यांच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रकाश दुर्गे व डॉ. आत्माराम तोंडे यांनी दिले.
या परिषदेतील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तीम्मा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक पुणम सिडाम यांनी मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक शंकर झाडे व शाळेतील इतर शिक्षकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
—



