दुर्दैवी अपघातात गडचिरोलीत ४ युवकांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक*
यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश*

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-07ऑगस्ट 2025
–गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे.
या अपघातात आणखी २ युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी तातडीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात येणार असून त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या एका तासात त्यांना नागपूरला रवाना करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हॅण्डल वरून दिली.
राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
या दु:खद घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली असून, जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक मदत तातडीने पुरवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना तत्काळ मदत व उपचाराची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.