गडचिरोली पोलीस दलाची शान — श्वान ‘सारा’ने पुण्यात राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकाविले
गुन्हे शोधक प्रकारात सर्वोत्तम कामगिरी; पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे श्वानपथकाचे कौतुक

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-23/09/2025
गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हिने पुणे येथे आयोजित 20 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात आपली चमकदार कामगिरी सादर करत श्वान पथक स्पर्धेमधील गुन्हे शोधक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलाचा राज्यस्तरावरचा लौकिक अधिकच उंचावला आहे.
पुणे येथे 15 ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या मेळाव्यात राज्यातील एकूण 25 विभागांनी सहभाग घेतला होता. सायंटिफिक एड टु इन्वेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अँटी सॅबोटेज चेक, श्वान पथक अशा विविध स्पर्धांमध्ये पोलीस दलाने आपले कौशल्य आजमावले. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तिन्ही प्रकारच्या परीक्षांमधून कसून मूल्यमापन करण्यात आले.
या स्पर्धेत श्वान सारा हिने आपल्या गुन्हे शोधक कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले. आता नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील श्वान स्पर्धेसाठी सारा ची महाराष्ट्रातून निवड झाली आहे, ही गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद बाब आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी श्वानपथकाचे प्रभारी अधिकारी श्री. ओमप्रकाश बोरेवार, श्वान हस्तक पोहवा/2134 राजेंद्र कौशिक व पोहवा/2314 अर्जुन परकीवार यांच्यासह सारा हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात पोलीस दलाची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी श्वानपथकाची ही कामगिरी प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी घडावी,” अशा शब्दांत अधीक्षकांनी शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाच्या या यशामुळे जिल्ह्यातील पोलीस जवानांमध्ये नवचैतन्य संचारले असून, ‘सारा’ आज संपूर्ण जिल्ह्याची शान ठरली आहे.