अवैध सुगंधित तंबाखू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
घटनास्थळावरून ७.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त.....

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक: –03सप्टेंबर 2025
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली असताना, गडचिरोली जिल्ह्यात मात्र काही जणांनी कायद्याला चकवा देत अवैध कारखाना सुरु केल्याचे उघडकीस आले आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ७.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दिनांक २ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, आरमोरी तालुक्यातील मौजा डार्ली येथे आरोपी ओमप्रकाश शंकर गेडाम याने इतर चार साथीदारांसह रेखाबाई सडमाके यांच्या घरी मशिनच्या सहाय्याने सुगंधित तंबाखू उत्पादनाचा अवैध कारखाना सुरु केला आहे. तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
तेथे पंचासमक्ष झडती घेतली असता, घरातून मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू व पॅकींगसाठी लागणारी यंत्रे व साहित्य मिळून आले.
जप्त मुद्देमाल

झडतीदरम्यान मिळालेल्या साठ्यामध्ये —
१३० नग “मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू”चे २०० ग्रॅम डब्बे (किंमत ₹१.३० लाख)
१०० नग ५० ग्रॅमचे टिन डब्बे (₹३० हजार)
२८८ किलो कच्चा तंबाखू (₹२.८८ लाख)
३ लोखंडी मशिन्स व पॅकींग साहित्य (₹२.५५ लाख)
वजन काटा, बॅग क्लोजर मशीन, हेअर स्ट्रेटनर व विविध साहित्य (₹३१,२००)
असा एकूण ₹७.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ओमप्रकाश गेडाम याला अटक करण्यात आली असून, इतर चार आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर गुन्हा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ सह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे करीत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन – टीमचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. समाधान दौड, पोहवा प्रे. नंदेश्वर, पोअं. राजकुमार खोब्राागडे, रोहित गोंगले, चापोअं. गणेश पवार यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
—✍️

jdwwm0