“अहेरीचा राजा” – पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणारायची हुबेहूब प्रतिकृती…

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:–31 ऑगस्ट 2025
अहेरी राजनगरीत यंदाच्या गणेशोत्सवात भव्य आणि अद्वितीय आकर्षण ठरला आहे “अहेरीचा राजा” हा मानाचा गणपती. माजी पालकमंत्री मा. राजे अंब्रीशराव महाराज यांच्या राजमहालाच्या प्रांगणात विराजमान झालेल्या या गणेशमूर्तीची विशेषता म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची हुबेहूब प्रतिकृती आहे.
गणपतीच्या स्वागतासाठी महाल परिसरात केलेली आकर्षक सजावट, रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपरिक ढोल–ताशांचा गजर यामुळे अहेरी शहर उत्साहाच्या लाटेत सामावून गेले आहे. सध्या राजमहालाचा प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून जात असून जिल्हाभरातूनच नव्हे तर छत्तीसगड व तेलंगण राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
भाविकांचे आकर्षणकेंद्र
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची रांग लागते. “अहेरीचा राजा” हा मानाचा गणपती असल्याने गावातील प्रत्येक घरातील भक्त मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतो. अनेक जण नवस फेडण्यासाठी, आरत्या करण्यासाठी व प्रसाद वाटपासाठी उत्साहाने सहभागी होत आहेत.
जिल्हाभरात प्रसिद्ध
गेल्या अनेक वर्षांपासून अहेरीतील गणपती उत्सव हा जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण ठरत असून, दरवर्षी नवीन उपक्रम आणि वेगवेगळ्या थीमवर आधारित सजावट करण्यात येते. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धा न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ म्हणून विकसित झाला आहे.
यंदाही तीन दिवसांचा भव्य मेळा भरविण्यात आला आहे. या मेळ्यात जिल्ह्यातील विविध गावे, शेजारील राज्यांतून आलेले भाविक सहभागी होत असून फेरफटका, खाद्यपदार्थांची दुकाने, झुल्यांचे स्टॉल्स यामुळे वातावरणात एक उत्सवी रंग भरला आहे.
लोकमान्यता
अहेरीच्या राजमहालातील हा गणपती आता “अहेरीचा राजा” या नावाने सर्वत्र ओळखला जाऊ लागला आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीसारखा देखणा गणराय पाहण्यासाठी जिल्हाभरातील भाविक उत्साहाने हजेरी लावत आहेत.
गणपती बाप्पा मोरया!