# एक गाव, एक वाचनालय” अंतर्गत जिजगाव येथे ७२ वे वाचनालय सुरू… – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

एक गाव, एक वाचनालय” अंतर्गत जिजगाव येथे ७२ वे वाचनालय सुरू…

गडचिरोली पोलीस दलाचा अभिनव उपक्रम....

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-13/09/2025

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात शिक्षण व बौद्धिक विकासाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी पोलीस दलाने राबविलेला “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम आज आणखी एका टप्प्यावर पोहोचला आहे. भामरागड उपविभागातील पोस्टे मन्नेराजाराम हद्दीतील मौजा जिजगाव येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्‌घाटन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला-पुरुष तसेच पोलीस दल, सीआरपीएफ व एसआरपीएफचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रध्वज फडकवत सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या निनादात पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या या दिंडीतून नागरिकांमध्ये वाचनाची आवड आणि पुस्तकांबद्दल आदर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

श्रमदानातून उभारले आधुनिक वाचनालय

स्थानिक नागरिक, पोलीस अधिकारी व जवान यांच्या श्रमदान आणि लोकवर्गणीतून सुसज्ज व आधुनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे स्वतंत्र अभ्यासिका, टेबल-खुर्च्या, पुस्तके ठेवण्याची कपाटे अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थींना मोठा फायदा होणार असून, त्यांची प्रशासकीय क्षेत्रात वाटचाल सुलभ होईल.

सन २०२३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ७१ वाचनालये उभारण्यात आली असून, ८ हजारांहून अधिक युवक-युवतींना त्याचा लाभ झाला आहे. त्यापैकी २०५ विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध विभागांत यशस्वीरीत्या नोकरी मिळवली आहे.

नागरिकृतीमुळे माओवादी भरती थांबली

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या विविध नागरिकृती व विकासाभिमुख उपक्रमांमुळे मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील एकाही तरुणाने माओवादी संघटनेत भरती न झाल्याचा महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शन

“या वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग नागरिक व विद्यार्थी करावा. या वाचनालयातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत पोहोचावेत, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हाच या उपक्रमामागील हेतू आहे. गडचिरोली पोलीस दल फक्त माओवादाविरुद्ध लढा देत नाही, तर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध आहे,” असे श्री. नीलोत्पल यांनी आपल्या भाषणात सांगितले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, सीआरपीएफ ९ बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्री. अमित सिन्हा, पोस्टे मन्नेराजारामचे प्रभारी पोउपनि श्री. शुभम शिंदे, एसआरपीएफ ग्रुप ४ नागपूरचे पोउपनि प्रशांत नरखेडे, तसेच स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि चंद्रकांत शेळके आणि स्थानिक अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.

–✍ विदर्भ न्यूज 24

 

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker