प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ‘आदि कर्मयोगी’ तालुकास्तरीय प्रशिक्षण

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-28/09/2025
सिरोंचा तालुक्यातील आदिवासी भागातील शासकीय योजनांचा शंभर टक्के लाभ आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय ‘आदि कर्मयोगी’ प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. दिनांक १५ व १६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा येथे दोन दिवस हे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तर पंचायत समिती सिरोंचा चे एस. एन. कस्तुरे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन करण्यात आले.
या अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडमधील हजारीबाग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. महाराष्ट्रात या उपक्रमाचा शुभारंभ १६ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते झाला.
महाराष्ट्रातील ३२ जिल्हे, २१४ तालुके आणि ४,९७५ गावे या उपक्रमासाठी निवडण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुके व ४११ गावे समाविष्ट आहेत. सिरोंचा तालुक्यातील ५७ आदिवासी गावे यामध्ये येतात.
अभियानांतर्गत केंद्र शासनाने १७ विभागांच्या माध्यमातून २५ योजना राबविण्याचा आराखडा आखला आहे. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, पंचायत राज, वन, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण आणि आदिवासी विकास विभागांचा समावेश आहे. या उपक्रमात स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग राहणार आहे.
प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका मास्टर ट्रेनर्स श्री. अशोक बंडावार, श्री. हेमंतकुमार तांबे, श्री. भास्कर गरपट्टी, श्री. कमलेश झाडे व श्री. सर्वेश गावडे यांनी सहकार्य केले.
या अभियानाचा मुख्य उद्देश आदिवासी भागात बहुस्तरीय क्षमता विकास घडवून आणणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व उत्तरदायी शासन व्यवस्था निर्माण करणे हा आहे. तालुका प्रशासनाने स्पष्ट केले की, “या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांची शंभर टक्के पोहोच प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे.”
एस.एन. कस्तुरे गट विकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांनी माहिती दिली की, या अभियानामुळे आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीला नवा वेग मिळणार आहे.