सिरोंचा तालुक्यात नवोदय प्रवेश परीक्षेसाठी ४६४ विद्यार्थ्यांचा सहभाग…
दोन परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा सुरू; भवितव्य निकालावर ठरणार

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 13 डिसेंबर 2025
सिरोंचा तालुक्यात आज नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रांवर मिळून एकूण ४६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, थोड्याच वेळात ही परीक्षा संपणार आहे. या परीक्षेच्या निकालानंतरच विद्यार्थ्यांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
नवोदय प्रवेश परीक्षेसाठी सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल, सिरोंचा येथे २६४ विद्यार्थी, तर कार्मेल इंग्लिश मीडियम स्कूल, सिरोंचा येथे २०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दोन्ही केंद्रांवर परीक्षा नियोजित वेळेत व शांततेत सुरू असून, विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने प्रश्नपत्रिका सोडवत आहेत.
ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय हे दर्जेदार शिक्षणाचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासह स्पर्धेची भावना स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी दीर्घ काळ मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी केली आहे.
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी तालुक्यातील संबंधित अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच शिक्षकांनी आवश्यक त्या विशेष व्यवस्था केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रांवर दक्षता घेण्यात आली आहे.
आता परीक्षा पूर्ण झाल्यानंतर या ४६४ विद्यार्थ्यांचे भवितव्य नेमके कोणत्या दिशेने जाईल, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
— विदर्भ न्यूज 24



