# बिग ब्रेकिंग — माओवादी चळवळीच्या इतिहासातील सर्वात मोठं आत्मसमर्पण! – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

बिग ब्रेकिंग — माओवादी चळवळीच्या इतिहासातील सर्वात मोठं आत्मसमर्पण!

माओवादी चळवळीला हादरा — केंद्रीय समिती व पोलिट ब्युरो सदस्य भूपतीसह तब्बल 60 माओवादी आत्मसमर्पित!

गडचिरोली (प्रतिनिधी) | विदर्भ न्यूज 24 नेटवर्क                 दिनांक:–14/10/2025

माओवादी चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण घडल्याची ऐतिहासिक घटना आज गडचिरोली जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. तब्बल साठ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून, त्यात माओवादी संघटनेचे सर्वोच्च नेते, केंद्रीय समिती व पोलिट ब्युरो सदस्य भूपती यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

चार दशकांचा सशस्त्र संघर्ष संपला!

भूपती उर्फ मल्लोजी याने जवळपास चाळीस वर्षे माओवादी चळवळ मजबूत करण्यासाठी, संघटनेचा विस्तार आणि शस्त्रसज्ज कारवाया उभारण्यासाठी काम केलं. त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांतील दंडकारण्याच्या अरण्यात मोठ्या प्रमाणावर संघटनेचा प्रभाव वाढला होता. मात्र सलग सुरक्षा दलांच्या कारवाया, संघटनेतील अंतर्गत मतभेद आणि विचारसरणीतील विसंवाद यामुळे अखेर त्याने आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्याचे समजते.

गडचिरोली पोलिसांचा पुन्हा एकदा विजय!

गडचिरोली पोलीस दलाने गत काही वर्षांपासून “लास्ट माईल स्ट्रॅटेजी” अंतर्गत माओवादी संघटनेतून सदस्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. याच उपक्रमाचा परिणाम म्हणून, आज झालेलं हे आत्मसमर्पण माओवादीविरोधी मोहिमेसाठी मोठा टप्पा ठरले आहे.
सूत्रांनुसार, आत्मसमर्पित माओवादींना शासनाच्या पुनर्वसन योजनेंतर्गत मदत दिली जाणार आहे.

माओवाद्यांच्या संघटनेला जबर धक्का

या आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यात कार्यरत माओवादी संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या रचनेला मोठा धक्का बसला आहे.
भूपती हा केवळ धोरणात्मक विचारवंत नव्हता, तर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती विभागातील माओवादी नेटवर्कचा मुख्य आधार होता. त्यामुळे त्याच्या शरणागतीमुळे संघटनेतील उर्वरित कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि निराशा पसरल्याचेही गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.

माओवादी चळवळीच्या इतिहासात आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. चाळीस वर्षे सशस्त्र संघर्ष करणाऱ्या एका शीर्ष नेत्याने संघटनेचा निरोप घेतल्याने ‘दंडकारण्यातील लाल चळवळीचा अध्याय आता मावळतीकडे’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!