नक्षलवाद्यांना नवी दिशा! कोनसरीतील ‘लाइट मेटल एनर्जी लिमिटेड’मध्ये मिळाली नोकरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा – आत्मसमर्पित माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 15 ऑक्टोबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘लाइट मेटल एनर्जी लिमिटेड’ या मोठ्या उद्योग प्रकल्पात आता आत्मसमर्पित माओवादी कार्यकर्त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा केली असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) प्रभाकरन यांनी विदर्भ न्यूज 24 शी बोलताना सांगितले की, “राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने आमच्या कंपनीने रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हे केवळ रोजगार नसून, नवी जीवनदिशा देणारे पाऊल आहे.”
प्रभाकरन यांनी सांगितले की, लाइट मेटल एनर्जी लिमिटेडमध्ये स्थानिक युवकांसह पूर्वी नक्षल चळवळीत सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात २५ ते ३० आत्मसमर्पित कार्यकर्त्यांना औद्योगिक तंत्रज्ञान, सुरक्षा आणि उत्पादन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत म्हटले की, “गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्यासाठी केवळ शस्त्र नव्हे, तर संधीचीही गरज आहे. आत्मसमर्पितांनी समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी उद्योग क्षेत्रात प्रवेश करणे हे परिवर्तनाचे द्योतक ठरेल.”
या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शांततेच्या आणि विकासाच्या प्रक्रियेला नवी गती मिळेल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, “हेच खरं शाश्वत पुनर्वसन आहे,” असे मत व्यक्त केले.
पार्श्वभूमी:
गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर माओवादी आत्मसमर्पण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रोजगार आणि पुनर्वसन यावर भर देत, उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लाइट मेटल एनर्जी लिमिटेड’चा हा उपक्रम या धोरणाचा भाग असून, गडचिरोलीच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी तो मैलाचा दगड ठरणार आहे.
– विदर्भ न्यूज 24



