मुख्य अभियंता व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी वर बेफिकीर रस्ता कामामुळे ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू – सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावर यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:_30ऑक्टोबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी वरील निकृष्ट व निष्काळजीपणे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे एका ट्रॅक्टर चालकाचा जीव गेला असून, या गंभीर घटनेला जबाबदार असलेल्या मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) व कंत्राटदार कंपनी ए.सी. शेख कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता संतोष रामचंद्र ताटीकोंडावर यांनी केली आहे.
दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पेंटीपाका येथील एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक, सूचना बोर्ड किंवा सावधान चिन्हे न लावल्याने हा अपघात घडल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
ताटीकोंडावर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “या महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असूनही, जनतेच्या जीविताची सुरक्षा राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नाही. मुख्य अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदारांच्या बेफिकिरीमुळे स्थानिक नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. रस्त्यावर अद्यापही नियमांचे पालन केले जात नाही, त्यामुळे या प्रकरणात मुख्य अभियंता व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करणे आवश्यक आहे.”
ताटीकोंडावर यांनी दि. २५ ऑक्टोबर रोजी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, रस्ता उभारणीचे काम सुरू असतानाही कोणतेही वाहतूक नियंत्रण चिन्ह किंवा सुरक्षितता उपाय दिसून आले नाहीत, हे स्पष्टपणे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देऊन संबंधितांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. बामणी पोलिस स्टेशनमार्फत या घटनेची चौकशी सुरू असून, अद्याप गुन्हा नोंद करण्यात झालेल्या विलंबाबाबत संतोष ताटीकोंडावर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
—
– विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी, गडचिरोली
—



