# परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, भारतीय लेकींनी कोरले क्रिकेट विश्वचषकावर नाव! – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, भारतीय लेकींनी कोरले क्रिकेट विश्वचषकावर नाव!

मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक:–20 डिसेंबर 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत व अभिनंदन करून संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने एकही सामना न हरता अपराजित राहून अंतिम सामना फक्त 12 षटकांत जिंकून इतिहास रचला. या संघाने राष्ट्राचा, तिरंग्याचा आणि राष्ट्रगीताचा सन्मान उंचावला, आणि संपूर्ण देश या कामगिरीने आनंदित झाला आहे.
कठीण परिस्थितीवर मात करून, अखंड मेहनतीच्या बळावर आणि हार न मानता, प्रत्येक खेळाडूने आपली संघर्षकथा साकार केली आहे. तुम्ही देशाला एक महान विजय मिळवून दिला आहे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल की ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ची पहिली विश्वविजेती टीम भारतीय आहे आणि त्या ऐतिहासिक विजयावर प्रत्येक खेळाडूचे नाव कोरले गेले आहे. या संघाने खऱ्या अर्थाने इतिहास घडवला आहे.
“कुछ किए बिना ही जयजयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती” या ओळी तुम्ही प्रत्यक्षात साकार केल्या आहेत. या अविस्मरणीय यशामुळे मला अत्यंत आनंद वाटतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या नोकरी व आर्थिक मदतीबाबत सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. संघासाठी कायमस्वरूपी सरावाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. मैदानासाठी योग्य जागेचा शोध घेऊन लवकरच कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतीय मुलींना खेळात कोणतीही अडचण बाधा ठरू नये यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी सर्व खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा संघाच्या कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडियाचे चेअरमन के. जी. महंतेश यांच्यासह विजयी संघातील खेळाडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!