अहेरी वृत्तसंस्था दिनांक 20 जानेवारी 2026
नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीनंतर परतत असताना नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना २० जानेवारी रोजी दुपारी घडली. खमनचेरू आणि बोरी दरम्यान असलेल्या दीना नदीच्या पुलावरून सदर वाहन कोसळल्याने हा अपघात झाला.
या अपघातात यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३, रा. आष्टी) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५, रा. बोरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अभिजीत यादव कोलपाकवार (४०, आष्टी), अर्चना यादव कोलपाकवार (आष्टी) आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार (बोरी) हे तिघे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांचा १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आलापल्लीच्या जंगल परिसरात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी मोक्का पंचनामा करून सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर २० जानेवारी रोजी नागेपल्ली येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
या अंत्यविधीसाठी परिसरातील तसेच विविध गावांतील नातेवाईकांनी हजेरी लावली होती. अंत्यविधी आटोपून यादव विठ्ठल कोलपाकवार, त्यांची पत्नी अर्चना, मुलगा अभिजीत, चुलत भाऊ सुनील मुरलीधर कोलपाकवार आणि त्यांची पत्नी पद्मा हे सर्वजण चारचाकी वाहन क्रमांक MH-33 V 8249 ने आष्टीकडे रवाना झाले होते.
प्राप्त माहितीनुसार, सदर वाहन अभिजीत यादव कोलपाकवार चालवत होता. बोरी येथून चुलत काका सुनील आणि काकू पद्मा यांना नागेपल्ली येथे आणण्यात आले होते. अंत्यविधीनंतर परतीच्या प्रवासात त्यांना बोरी येथे सोडून अभिजीत आपल्या आई-वडिलांसह आष्टीला जाणार होता. मात्र, खमनचेरूनंतर दीना नदीच्या पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली.
अपघातानंतर जखमींना तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान यादव विठ्ठल कोलपाकवार आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कोलपाकवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
