अहेरी प्रतिनिधी दिनांक:– 22 जानेवारी 2026
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात खळबळ उडविणाऱ्या खून प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावत अहेरी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. दारूच्या नशेत गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मौजा नागेपल्ली येथील रहिवासी रविंद्र तंगडपल्लीवार (वय ५०) हे पत्नीला प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली येथे आरडीचे पैसे भरण्यास जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र ते संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी अहेरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली.
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वरील नागामाता मंदिराजवळील जंगल परिसरात मिसिंगमधील इसमाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने डोके, मान व चेहऱ्यावर वार करून निर्दयपणे खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. याप्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मदीरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. कोणताही ठोस धागा नसताना देखील मुखबिरांची माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली.
या प्रकरणातील आरोपी समय्या मलय्या सुंकरी (वय ३५), रा. मद्दीगुडम, ता. अहेरी यास दि. २० जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत दारूच्या नशेत मृताच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी हिसकावण्यासाठी खून केल्याचे मान्य केले.
दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे करीत आहेत. असे माहिती आहे रे पोलिसांकडून प्राप्त झाली आहे
दारू, लोभ आणि क्षणिक लालसेपोटी एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला. मात्र अहेरी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपी लवकरच गजाआड पोहोचला — हेच दिलासादायक.
