विदर्भ न्यूज 24 नेटवर्क | गडचिरोली | 19 जून 2026
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारूची वाहतूक आणि विक्री करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध दारूसह चारचाकी वाहन असा एकूण 11 लाख 5 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघे आरोपी फरार आहेत.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 19 जून रोजी उपपोस्टे पेंढरी हद्दीत विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लखन जोहारी भैसा (वय 40, रा. बेडगाव, ता. कोरची) हा आपल्या साथीदारांच्या मदतीने पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. CG 08 AR 5976) वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याची वाहतूक करून पेंढरी परिसरातील चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगेवाडा ते पेंढरी मार्गावर दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. काही वेळातच संशयित स्कॉर्पिओ वाहन तेथे येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. मात्र वाहनातील चालकाच्या शेजारी बसलेले दोन जण पोलिसांना पाहून अंधार आणि शेतशिवाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडची मद्यसाठा आढळून आला. यात रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 96 बाटल्या, माउंट 6000 बिअरच्या 480 बाटल्या, लेमाउंट बिअरच्या 318 बाटल्या, मॅकडॉवेल्स नंबर वन रिझर्व व्हिस्कीच्या 48 मोठ्या व 96 लहान बाटल्या तसेच गोवा व्हिस्कीच्या 300 बाटल्या असा साठा मिळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत 4 लाख 5 हजार 800 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची किंमत 7 लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 11 लाख 5 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी उपपोस्टे पेंढरी येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 31/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ) व 83 अन्वये लखन जोहारी भैसा, तसेच फरार आरोपी निर्मल धमगाये व तरुण धमगाये (दोघेही रा. कोरची) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम जाधव, उपपोस्टे पेंढरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस अंमलदार प्रशांत गरफडे, सचिन घुबडे आणि चापोअं दीपक लोणारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बातमीचे टॅग्स:
#GadchiroliPolice #LiquorBan #IllegalLiquor #Korchi #Pendhari #CrimeNews #PoliceAction #MahindraScorpio #VidarbhaNews24 #GadchiroliNews #MaharashtraPolice #LiquorSeizure #BreakingNews
