संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 23 जानेवारी 2019
आदिवासी समाजाचे परमदैवत आणि अधिवासांचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या सम्मक्का–सरलम्मा देवीच्या दर्शनासाठी दर दोन वर्षांनी मेडारामच्या पवित्र भूमीवर कोट्यवधी भाविकांची अलोट गर्दी उसळते. दक्षिण भारतातील ‘कुंभमेळा’ तसेच आशियातील सर्वात मोठी आदिवासी धार्मिक जत्रा म्हणून ओळखली जाणारी ही मेडाराम महाजात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, श्रद्धा, बलिदान आणि आदिवासी अस्मितेचा महोत्सव मानली जाते. येत्या 28 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत तेलंगाना राज्यातील मूलगु जिल्ह्यातील मेडाराम येथे पुन्हा एकदा भक्तीभावाने ओथंबलेले दृश्य पाहायला मिळणार आहे.
घनदाट जंगलाच्या कुशीत, डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यात आणि निसर्गाच्या साक्षीने भरवली जाणारी ही जत्रा आदिवासी समाजाच्या श्रद्धेचा कळस दर्शवते. कोणत्याही भव्य मंदिराविना, दगड–मातीच्या साधेपणात देवीचे दर्शन घेण्याची परंपरा ही मेडाराम जत्रेची स्वतंत्र ओळख आहे. आदिवासी बांधवांसाठी सम्मक्का–सरलम्मा या केवळ देवता नसून, अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या मातृशक्तीचे आणि संघर्षाचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळेच या जत्रेला धार्मिकतेसोबतच ऐतिहासिक, सामाजिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मेडाराम जत्रेसाठी तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओडिशा तसेच मध्य भारतातील विविध भागांतून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. महाराष्ट्रातील सिरोंचा तालुका, अहेरी विधानसभा क्षेत्र, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग, तसेच छत्तीसगडच्या सीमावर्ती गावांमधून हजारो भाविक पायी, वाहनांनी अथवा समूहाने मेडारामकडे प्रवास करतात. नवस, उपवास आणि परंपरागत विधी पाळत देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची ही वाटचाल श्रद्धेचा जिवंत अनुभव देणारी ठरते.
या जत्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ आदिवासी समाजच नव्हे, तर अनेक जाती, धर्म आणि समाजघटकांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. जात, धर्म, प्रांताच्या सीमा ओलांडून देवीच्या दर्शनासाठी एकत्र येणारा हा जनसमुदाय मेडाराम जत्रेची व्यापकता आणि सामाजिक एकात्मता अधोरेखित करतो. श्रद्धेच्या या प्रवाहात सर्व भेद विसरून भाविक एकाच भक्तीभावाने देवीसमोर नतमस्तक होतात.
28 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या जत्रेदरम्यान, विशेषतः रात्रीच्या वेळेस, मेडारामचा संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारावून जातो. जंगलात पेटवलेले दिवे, ढोल-नगाऱ्यांचा निनाद, पारंपरिक मंत्रोच्चार आणि भाविकांची शांत प्रतीक्षा या साऱ्यांतून भक्तीचा अनुभव अधिक गडद होतो. 29 जानेवारी रोजी सम्मक्का ताईंच्या आगमनाने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचतो, तर 30 जानेवारीच्या मुख्य दर्शनाच्या दिवशी श्रद्धेचा महासागर अक्षरशः उसळतो.
‘बंगारम्’ म्हणजेच गूळ अर्पण करण्याची परंपरा ही मेदाराम जत्रेतील आदिवासी संस्कृतीच्या साधेपणाचे प्रतीक आहे. ऐश्वर्य, दिखावा किंवा वैभवापेक्षा श्रद्धेला अधिक महत्त्व देणारी ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पाळली जाते. देवीच्या दर्शनानंतर अनेक भाविक डोळ्यांत अश्रू आणि मनात समाधान घेऊन परततात, हीच या जत्रेची खरी ओळख मानली जाते.
दर दोन वर्षांनी भरवली जाणारी मेडाराम महाजात्रा ही आदिवासी समाजाच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव असून, आशियातील सर्वात मोठ्या कुंभमेळ्यासारखी ओळख निर्माण करणारा धार्मिक-सांस्कृतिक सोहळा आहे. येत्या जानेवारीत पुन्हा एकदा मेडाराममध्ये देवीच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविक एकत्र येणार असून, श्रद्धा आणि संस्कृतीचा हा अद्वितीय संगम इतिहासाची साक्ष देणारा ठरणार आहे.
■ जम्पन्ना वागू : पवित्र स्नानाचे श्रद्धास्थान
मेडाराम यात्रेदरम्यान भाविक सर्वप्रथम जम्पन्ना वागू (नाला) येथे स्नान करूनच देवीच्या दर्शनासाठी पुढे जातात. आदिवासी श्रद्धेनुसार जम्पन्ना वागू हे वीर जम्पन्नाचे प्रतीक मानले जाते. येथे स्नान केल्यास सर्व पापांचे क्षालन होते आणि मन शुद्ध होते, अशी अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे जत्रा काळात लाखो भाविक पहाटेपासून जम्पन्ना वागू येथे स्नानासाठी गर्दी करतात. घनदाट जंगलात वाहणाऱ्या या पवित्र प्रवाहाला मेदाराम यात्रेतील आध्यात्मिक प्रारंभबिंदू मानले जाते.
या महाजत्रेसाठी महाराष्ट्र–तेलंगणा सीमाभागातून जाणाऱ्या भाविकांसाठी प्रवासही श्रद्धेचाच एक भाग ठरतो. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून मेदाराम हे सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असून, अहेरी–सिरोंचा सीमाभागातील हजारो भाविक दर दोन वर्षांनी हा प्रवास करतात. जत्रा काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता खासगी बसेस, टॅक्सेस तसेच तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. भाविकांसाठी प्रामुख्याने कालेेश्वर मार्गे भूपालपल्ली जिल्ह्यातील काटाराम येथे पोहोचून तेथून वडण मार्गाने मेडा राम गाठावे लागते. घनदाट जंगल, अरुंद रस्ते आणि डोंगराळ भागातून होणारा हा प्रवास जरी कष्टदायक असला, तरी देवीच्या दर्शनाच्या ओढीपुढे तो क्षुल्लक वाटतो, असे भाविक आवर्जून सांगतात.
—
