गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 22 जानेवारी 2026
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा उपवनसंरक्षण क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कमलापुर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत वन विभागाच्या नावाखाली सुरू असलेल्या लाचखोरीचा गंभीर प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. वनजमिनीवर अवैधपणे काम सुरू असल्याचा आरोप करत जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवरील दंड कमी करून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिरोंचा उपवनसंरक्षण क्षेत्रातील क्षेत्र सहाय्यकाला एसीबीच्या गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) रोजी राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली.
या प्रकरणातील लाचखोर अधिकारी म्हणून सिरोंचा उपवनसंरक्षण क्षेत्रातील कमलापुर वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले क्षेत्र सहाय्यक आलोसे महेश जयंतराव धामनगे (वय ४७) यांचे नाव पुढे आले असून त्यांच्याविरुद्ध उपपोस्ट राजाराम (खां) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्षलप्रभावित भागात निर्भयपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण वन विभागात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हा तेलंगणा राज्यातील रहिवासी असून तो राजाराम (खां) परिसरात आपल्या काकांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या शेतीची मोबदला घेऊन मशागत करत होता. याच दरम्यान दोन वनरक्षकांनी घटनास्थळी येत ‘वनजमिनीवर अवैधपणे काम सुरू आहे’ असा ठपका ठेवत ट्रॅक्टर जप्त केला. ट्रॅक्टर जप्तीनंतर काही वेळातच क्षेत्र सहाय्यक महेश धामनगे यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला आणि गुन्हा दाखल न करता तसेच कमी दंडात प्रकरण मिटवून देण्यासाठी सुरुवातीला २५ हजार रुपयांची लाच मागितली.
शासकीय यंत्रणेच्या दबावापुढे न झुकता तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत सगणे यांनी दोन पंचांसह गोपनीय शहानिशा केली. शहानिशेदरम्यान १० हजार रुपयांची लाच मागणी निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे सिरोंचा उपवनसंरक्षण क्षेत्रातील अतिसंवेदनशील व नक्षलप्रभावित राजाराम (खां) गावात महेश धामनगे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर आरोपीच्या राजाराम (खां) व चंद्रपूर येथील निवासस्थानांवर एसीबीच्या गडचिरोली व चंद्रपूर युनिट्सकडून झडती घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक विक्रांत सगणे यांनी केले. त्यांना पोलीस निरीक्षक किरण बगाटे, पोलीस हवालदार किशोर जौंजारकर तसेच एसीबीच्या इतर कर्मचाऱ्यांनी साथ दिली.
दरम्यान, सिरोंचा उपवनसंरक्षण क्षेत्रात अशा प्रकारे लाचखोरीचे प्रकार उघडकीस आल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वनजमीन, शेतकरी आणि वाहन जप्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक पिळवणुकीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा दलाल यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त कोणतीही लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत सगणे यांनी केले आहे.
— विदर्भ न्यूज 24
