गडचिरोली (विदर्भ न्यूज 24) दिनांक:-21 जानेवारी 2026 गडचिरोलीसारख्या वनसमृद्ध, आदिवासी संस्कृतीने नटलेल्या भागात उभे राहिलेले गोंडवाना विद्यापीठ म्हणजे आधुनिक काळातील नव तपोवन असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी काढले. गोंडवाना विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या नव्या सांस्कृतिक सभागृहात हा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
डॉ. अभय बंग म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठ हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे विद्यापीठ नसून समाजमन घडविणारे केंद्र बनत आहे. गोंडी व माडिया भाषांचे संवर्धन, बांबू संशोधन, ‘एकल’, ‘विद्यापीठ आपल्या गावात’ यांसारख्या उपक्रमांमधून स्थानिक समाजाशी विद्यापीठाने मजबूत सामाजिक अनुबंध जोडले आहेत. कौशल्याधारित शिक्षणामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळत असून स्थानिक समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणारी व्यक्ती घडवणे नसून जीवन कसे जगावे याचे संस्कार देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आजची युवा पिढी ही भारताचे भवितव्य घडविण्याची खरी ताकद आहे. ही पिढी एक सुपर पॉवर आहे. मात्र या शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी नवोन्मेषी, संवेदनशील आणि समाजाभिमुख शिक्षणाची गरज आहे. आजच्या युवांपुढे सामाजिक प्रश्नांना आजीविकेची साधने बनविण्याची मोठी संधी आहे. केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः रोजगारनिर्मितीक्षम बनणे ही काळाची गरज आहे. नव्या जगाचे आकलन करत कला, सृजनशीलता व सहृदयता अंगी बाणवून केवळ अर्थप्राप्तीसाठी न जगता अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ हा विद्यापीठाच्या स्वतःच्या नव्या सांस्कृतिक सभागृहात पार पडणे हे ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. ‘एकल प्रकल्प’, ‘विद्यापीठ आपल्या गावात’, ‘SPARC’, ‘गोसेखुर्द प्रकल्प’, ‘वीर बाबुराव शेडमाके योजना’, ‘स्कूल कनेक्ट’, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यापीठ सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहे. या सर्व उपक्रमांच्या यशामागे विद्यापीठातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. बोकारे यांनी पुढे सांगितले की, अडपल्ली येथील 170 एकर जागेवर गोंडवाना विद्यापीठाच्या भव्य व देखण्या परिसराचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात विद्यार्थी व समाजाप्रती स्वतःचे उत्तरदायित्व सिद्ध करणारे विद्यापीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दीक्षांत समारंभास गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर डॉ. मनोज डायगव्हाणे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. श्याम खंडारे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखा डॉ. प्रगती नरखेडकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा डॉ. जयेश चक्रवर्ती, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा डॉ. अशोक मिस्त्री, वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, व्यवस्थापन परिषद सदस्य राज्यपाल नामनिर्देशित प्रशांत मोहिते, स्वप्नील दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार विवेक गोर्लावार, डॉ. लेमराज लडके, डॉ. संजय गोरे, डॉ. रंजना लाड, सहसंचालक उच्चशिक्षण नागपूर संतोष चव्हाण, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद सदस्य, दानदाते, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभात विशेष गुणवत्ता व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आचार्य (Ph.D.) पदवी, पदव्युत्तर पदवी व पदवी प्रदान करण्यात आली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून नेवाजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) येथील वैष्णवी संजय थेरकर हिने तीन सुवर्णपदके मिळवून सर्वाधिक सुवर्णपदके पटकावली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, नागभीड (जिल्हा चंद्रपूर) येथील जादा रबिया रियाज हिनेही तीन सुवर्णपदके मिळवून विशेष गौरव प्राप्त केला.
आचार्य पदवी वितरणामध्ये मानव विज्ञान विद्याशाखेतील 43, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 34, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील 15 आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखेतील 4 अशा एकूण 96 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
विद्याशाखानिहाय सुवर्णपदकांमध्ये मानव विज्ञान विद्याशाखा 23, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 8, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा 5 आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखा 3 अशी एकूण 39 सुवर्णपदके देण्यात आली. यासोबत एक रजत पदक, एक इंद्रधनुष्य, एक अश्वमेध आणि एक आचार्य पदवी इतिहास पदक देण्यात येऊन एकूण 43 पदकांचे वितरण करण्यात आले. तसेच SPARC (Social Programme on Addiction in Rural Community) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. अपर्णा भाके आणि मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. सविता गोविंदवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
