भामरागड प्रतिनिधी (विदर्भ न्यूज 24) दिनांक:24/01/2026
माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. उपविभाग भामरागड अंतर्गत छत्तीसगड राज्याच्या सीमेपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम बिनागुंडा गावात दि. 24 जानेवारी 2026 रोजी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. उपपोस्टे लाहेरीपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेले हे मदत केंद्र दुर्गम भागातील नागरिकांसाठी सुरक्षेचा कणा ठरणार असून प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रभावी मार्ग ठरणार आहे.
सन 2023 पासून माओवादग्रस्त भागातील सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या साखळीतील हे दहावे पोलीस मदत केंद्र आहे. या केंद्राच्या स्थापनेमुळे बिनागुंडा परिसरातील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होणार असून माओवादी हिंसक कारवायांना आळा बसण्याच्या दृष्टीने हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन, 9 मार्च 2025 रोजी कवंडे येथे पोलीस स्टेशन, 23 नोव्हेंबर 2025 रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे पोलीस मदत केंद्र तसेच 19 डिसेंबर 2025 रोजी तुमरकोठी येथे पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली असून, या सर्व उपक्रमांमुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
या पोलीस मदत केंद्राची उभारणी अवघ्या 24 तासांत करण्यात आली असून, यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूण 1000 सी-60 कमांडो, 18 बीडीडीएस पथक, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या सहाय्याने ही उभारणी पार पडली. 1050 मनुष्यबळ, 11 जेसीबी, 10 ट्रेलर, 5 पोकलेन आणि 40 ट्रक यांच्या मदतीने अतिदुर्गम जंगल परिसरात अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभे राहिले, ही बाब गडचिरोली पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे ठोस उदाहरण मानली जात आहे.
नवीन पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये वायफाय सुविधा, आठ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, आर.ओ. प्लांटद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल टॉवर, स्वच्छतागृह सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मॅक वॉल, बी.पी. मोर्चा व सँड मोर्च्यांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी व 56 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप-19 कुसळगाव बी कंपनीचे दोन प्लाटून, सीआरपीएफ 09 बटालियन डी कंपनीचे एक असिस्टंट कमांडंट व 79 जवान तसेच विशेष अभियान पथकाची आठ पथके म्हणजेच 200 कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांसाठी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस मदत केंद्र बिनागुंडा हद्दीतील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महिलांना साड्या, पुरुषांना धोतर व ब्लॅंकेट, स्वयंपाकासाठी भांड्यांचा संच, बकेट व मच्छरदाणी देण्यात आली. युवकांना टी-शर्ट, नोटबुक, पेन, शाळेच्या पिशव्या तर लहान मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट व व्हॉलीबॉलचे वाटप करण्यात आले.
या भागात वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पूर्णत्वास जाण्यास मदत होणार असून सात मोबाईल टॉवरच्या कामाला गती मिळणार आहे. पावसाळ्यात गुंडेनूर नाल्याला येणाऱ्या पुरामुळे बंगाडी, कुवाकोडी, फोडेवाडा, बिनागुंडा व इतर गावांचा चार महिन्यांपर्यंत संपर्क तुटत असे; मात्र आता पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे गुंडेनूर नाल्याच्या पुलाच्या बांधकामाला आवश्यक सुरक्षा मिळणार असून या कामास वेग येणार आहे. यासोबतच भविष्यात या अतिदुर्गम भागात एस.टी. बस सेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचणे शक्य होणार असून येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी केले. वाढलेल्या सुरक्षेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
या पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, सीआरपीएफ 09 बटालियनचे कमांडंट श्री. शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते तसेच पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस अंमलदार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
