आलापल्ली (प्रतिनिधी) दिनांक 26 जानेवारी 2026
दुर्गम व आदिवासी भागात सातत्याने आरोग्यसेवा पोहोचवण्याचे कार्य करणारे वेलगुर प्राथमिक आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश लाडसकर यांचा ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. जिल्हा मुख्यालयी आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात माननीय सह-पालकमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी आविश्यांत पांडा यांच्या हस्ते त्यांना ‘उत्कृष्ट आरोग्य सेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहेरी तालुक्यातील वेलगुर प्राथमिक आरोग्य पथकात कार्यरत असलेले डॉ. गणेश लाडसकर यांनी दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर, नियमित आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. उपचारांसोबतच रुग्णांशी संवाद, आजाराबाबत समजावून सांगणे, तपासणीनंतर पाठपुरावा आणि आवश्यकतेनुसार तातडीची मदत देण्यामुळे परिसरातील नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेबाबतचा विश्वास वाढला आहे. यामुळे अनेक रुग्ण खाजगी दवाखान्याऐवजी प्राथमिक आरोग्य पथकात उपचारासाठी येत आहेत.
डॉ. लाडसकर यांनी महिलांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य दिले असून दुर्गम भागातील गरोदर महिलांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य पथकात अनेक सुरक्षित व यशस्वी प्रसूती पार पडल्या असून मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये प्राथमिक आरोग्य पथकावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रशासनाने डॉ. लाडसकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. दुर्गम भागात राहून शहरी सुविधांच्या तोडीची आरोग्यसेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हा सन्मान संपूर्ण आरोग्य विभागासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असल्याचे नमूद करत डॉ. गणेश लाडसकर यांनी सांगितले की, “रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या कामाचे मोजमाप आहे. प्रशासनाकडून मिळालेला हा सन्मान पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
विशेष म्हणजे, डॉ. गणेश लाडसकर यांनी सिरोंचा व अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात अनेक वर्षांहून अधिक काळ सेवा देत गोरगरिबांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल अहेरी तालुक्यासह जिल्हा आरोग्य वर्तुळातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असल्याचे नमूद करत,
“रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या कामाचे मोजमाप आहे. प्रशासनाकडून मिळालेला हा सन्मान पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
— डॉ. गणेश लाडसकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य पथक, वेलगुर— विदर्भ न्यूज 24
