गडचिरोली विशेष प्रतिनिधी नेटवर्क दिनांक:25जानेवारी 2026
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्याला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीस्तरावर मान्यता मिळाली आहे. दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी मा. महामहीम राष्ट्रपती यांनी जाहीर केलेल्या पोलीस शौर्य पदकांमध्ये गडचिरोली पोलीस दलातील 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश असून, यामुळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.
देशभरात यंदा एकूण 121 पोलीस शौर्य पदके जाहीर झाली असून, त्यापैकी तब्बल 31 पदके गडचिरोली पोलीस दलाला मिळणे ही बाब दलाच्या कार्यक्षमतेचे आणि धाडसाचे द्योतक मानली जात आहे. यापूर्वी सन 2025 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 07 अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते.
सदर पोलीस शौर्य पदके 22 एप्रिल 2018 रोजी मौजा बोरीया–कसनासूर येथे झालेल्या ऐतिहासिक पोलीस–माओवादी चकमकीतील शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आली आहेत. या चकमकीदरम्यान गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत नियोजनबद्ध व धाडसी कारवाई करत 40 माओवाद्यांचा खात्मा केला होता. या निर्णायक कारवाईमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. या मोहिमेत दाखवलेल्या धैर्य, शिस्तबद्ध कामगिरी आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर पोचय्या नैताम व वासुदेव राजम मडावी यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ स्तरावरील एकूण 31 अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत गडचिरोली पोलीस दलास एकूण 03 शौर्यचक्र आणि 217 पोलीस शौर्य पदके प्राप्त झाली असून, ही बाब देशातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील एकूण 394 पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये 82 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली असून, त्यापैकी 09 जणांना वेगवर्धित पदोन्नती मिळाली आहे. तसेच 302 पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली असून, त्यातील 01 पोलीस नाईकाला वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे.
कर्तव्यावर शहीद झालेल्या 14 पोलीस अंमलदारांनाही पदोन्नती देऊन शासनाने त्यांच्या बलिदानाचा सन्मान केला आहे. यामध्ये 07 शहीद पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी, तर 07 शहीद पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तसेच पदोन्नती प्राप्त अधिकारी व अंमलदारांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुलराज जी. यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा हा गौरव संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.
— विदर्भ न्यूज २४
