गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 06 फेब्रुवारी 20206
छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील अतिदुर्गम आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या अबुजमाड परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या व्यापक नक्षलविरोधी अभियानाला गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या अभियानात गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय (माओवादी) संघटनेच्या कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याच्यासह एकूण 07 जहाल माओवादी ठार झाले आहेत.
ठार करण्यात आलेल्या प्रभाकर याच्यावर शासनाकडून २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. माओवाद्यांच्या संघटनात्मक रचनेत प्रभाकर हा अत्यंत महत्त्वाचा व धोकादायक नेता मानला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
काल रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरून 03 माओवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर आज दिवसभरात सुरू असलेल्या शोध व चकमक मोहिमेदरम्यान आणखी 04 माओवाद्यांचे मृतदेह (02 पुरुष व 02 महिला) हस्तगत करण्यात आले. या तीन दिवसांच्या अभियानाच्या अखेरीस एकूण 07 माओवादी (04 पुरुष व 03 महिला) ठार झाल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून 03 AK-47, 01 SLR आणि 01 .303 रायफल अशी एकूण 05 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याबाबतची सविस्तर माहिती उद्या आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे गडचिरोली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
शौर्यगाथा लिहिताना जवान दीपक मडावी यांना वीरगती
या तीव्र चकमकीदरम्यान C-60 पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८), सध्या रा. अहेरी व मूळ रा. मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी, यांनी असामान्य धैर्याचे प्रदर्शन करत माओवाद्यांशी समोरासमोर लढा दिला. चकमकीदरम्यान त्यांनी 02 माओवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या कारवाईत त्यांना गोळी लागून गंभीर दुखापत झाली होती.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले. मात्र, झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढताना त्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आणखी एक जवान जखमी; प्रकृती स्थिर
या अभियानादरम्यान जवान जोगा मडावी (रा. किष्ट्यापल्ली) हेही गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तातडीने बाहेर काढून गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
अबुजमाड परिसरात या अभियानामुळे माओवादी हालचालींना मोठा आळा बसला असून, गडचिरोली पोलिसांच्या या निर्णायक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभियानासंदर्भातील अधिक तपशील, मृत माओवाद्यांची ओळख आणि पुढील कारवाईबाबतची माहिती उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.
