गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक 06फेब्रुवारी 2020
शहीद दिपक मडावी यांना अखेरचा सॅल्यूट; लहानग्या मुलाच्या मानवंदनेने डोळे पाणावले
गडचिरोली पोलीस मुख्यालयात शहीद जवान दिपक मडावी यांना मानवंदना
कर्तव्यावर बलिदान; शहीद दिपक मडावी यांना शासकीय मानवंदना
छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील अतिदुर्गम आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या अबुजमाड परिसरात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले असून, या कारवाईत C-60 दलाचे शूर जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८) यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढताना वीरमरण पत्करले.
आज सकाळी घटनास्थळावरून एक पुरुष व एक महिला असे दोन माओवादी मृतदेह हस्तगत करण्यात आले. याआधी एका माओवादीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण तीन माओवादी (२ पुरुष, १ महिला) ठार झाले आहेत. मृत माओवाद्यांकडून १ एके-४७ रायफल व १ एसएलआर शस्त्र जप्त करण्यात आले असून, तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, या अभियानादरम्यान गंभीर जखमी झालेले C-60 जवान दिपक चिन्ना मडावी, सध्या राहणार अहेरी व मूळ रहिवासी मांड्रा (दामरांचा), तालुका अहेरी, यांना आज पहाटे अबुजमाडच्या घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, अभियानादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आणखी एक जवान जखमी, प्रकृती स्थिर
या चकमकीत जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हेही गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितरित्या भामरागड येथे आणण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच गडचिरोली येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना
शहीद जवान दिपक मडावी यांच्या पार्थिवाला आज पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपमहानिरीक्षक अंकित गोयल आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दीपक यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी डॉ. सिंगल यांनी दीपक मडावी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना, “दीपक यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षल्यांशी धैर्याने लढा दिला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे आश्वासन दिले
लहानग्या मुलाचा सॅल्यूट; वातावरण गहिवरले
मानवंदनेच्या वेळी वातावरण अत्यंत शोकाकूल झाले होते. दीपक मडावी यांच्या १० वर्षीय मुलाने नातेवाईकाच्या कडेवर बसून आपल्या वडिलांच्या पार्थिवाला दिलेला सॅल्यूट पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. दीपक यांची वृद्ध आई श्रद्धांजली वाहताना बेशुद्ध पडली, त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले.
यानंतर शहीद जवान दीपक मडावी यांचे पार्थिव अहेरी तालुक्यातील दामरांचा या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, अबुजमाडच्या जंगल परिसरात शोध मोहीम अद्याप सुरू असून, गडचिरोली पोलीसांकडून पुढील अधिकृत माहिती वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
