सिरोंचा (जि. गडचिरोली) प्रतिनिधी दिनांक:-6 फेब्रुवारी 2026
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलनात हिंदुत्वाची खरी व्याख्या, सामाजिक समरसता, कर्तव्यभावना, पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक एकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. विविध पक्ष, विचार, पूजा पद्धती, वेशभूषा, जाती व पंथ यांना एकत्र बांधणारा व्यापक विचार म्हणजेच हिंदुत्व असल्याचे प्रतिपादन या संमेलनातील वक्त्यांनी केले.
या संमेलनात विशेष मार्गदर्शन करताना श्री जिन्ना सत्यनारायण रेड्डीजी यांनी हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करत सांगितले की, हिंदुत्व कोणत्याही एका जातीपुरते, पंथापुरते किंवा विचारापुरते मर्यादित नसून सर्वांना एकत्र घेऊन चालणारी जीवनपद्धती आहे. “सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः” हा हिंदू संस्कृतीचा मूलमंत्र असून आमची संस्कृती कोणालाही लहान-मोठे मानत नाही, भेदभाव शिकवत नाही, तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण देते, असे त्यांनी नमूद केले.
हिंदू समाजाचा इतिहास सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या भूमीवरील पहिला हिंदू राज्याभिषेक असून त्यांच्या संपूर्ण आचरणातून, राज्यकारभारातून हिंदू संस्कृतीची मूल्ये प्रकट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी सर्व धर्म, जाती आणि समाजघटकांना न्याय देणारे राज्य उभारले, हा आदर्श आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने देशभरात मंडल, वस्ती व शहरी स्तरावर हिंदू संमेलनांचे आयोजन होत असल्याचे सांगून, या संमेलनातून समाजासमोर पंचसूत्री मांडली जात असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कुटुंब व्यवस्था बळकट करणे, सामाजिक समरसता राखणे, अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवणे, पर्यावरण संरक्षण आणि समाजहिताचा विचार या पाच महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
मतदानाचा अधिकार हा विकण्यासाठी नसून जबाबदारीने वापरण्यासाठी आहे, असे ठाम मत मांडताना त्यांनी नागरिकांनी आपल्या घटनात्मक अधिकारांची जाणीव ठेवावी आणि कर्तव्यभावनेने निर्णय घ्यावेत, असे आवाहन केले. पर्यावरण विषयावर बोलताना प्लास्टिकमुक्ती, पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या तीन गोष्टींवर विशेष भर देण्यात आला.
या संमेलनात उपस्थित गुरूंनी हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करत हिंदू समाजाची संघटनशक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. अशा प्रकारचे संमेलन समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात गंगेच्या पूजनानंतर भव्य कलश यात्रेने झाली. या यात्रेत मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. ‘जय श्री राम’, ‘भारत माता की जय’, ‘हर हर गंगे’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. कलश यात्रा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर वक्ते, अतिथी व संयोजकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर सादर करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील नृत्य आणि प्रभू श्रीरामावर आधारित नृत्यप्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात आविष्कार इंग्लिश मीडियम स्कूल व जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शहरातील सर्व मंदिरांतील पुजाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामान्नाजी तोटावार यांनी केले, संचालन जनार्धन अग्गुवार यांनी तर आभार प्रदर्शन रणजीत गागापुरवार यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थिती आणि उत्स्फूर्त सहभागामुळे हे भव्य हिंदू संमेलन सामाजिक एकता, सांस्कृतिक जागृती आणि हिंदुत्वाच्या मूल्यांचा प्रभावी संदेश देणारे ठरले, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
