आष्टी (गडचिरोली ) विशेष प्रतिनिधी दिनांक 28 जून 2026
आष्टी–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवरील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावर पुन्हा तडे पडल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या पुलाची अवघ्या वर्षभरातच दुरवस्था झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
याच पुलावर दोन महिन्यांपूर्वी मोठा खड्डा पडल्याने गंभीर अपघात घडला होता. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून तातडीने डागडुजी करून खड्डा बुजवण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी खड्डा पडला होता त्यालगतच आता पुन्हा पुलावर तडे गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे करण्यात आलेली दुरुस्ती ही केवळ तात्पुरती आणि वरवरची असल्याचे स्पष्ट होत असून, पुलाच्या मूळ बांधकामाच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पुलाची अशी अवस्था वर्षभराच्या आत होणे अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का, गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया योग्य प्रकारे राबविण्यात आली होती का आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी नेमकी कशी केली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
यापूर्वी खड्डा पडल्याच्या घटनेनंतर नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच अशा दर्जाहीन कामांमुळे सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागण्यांनंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला कोणताही जाब विचारलेला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
आष्टी–चंद्रपूर मार्ग हा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून, या पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने प्रवास करतात. अशा परिस्थितीत पुलावर पुन्हा तडे पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पुलाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच पुलाची संपूर्ण संरचनात्मक तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.
