गडचिरोली प्रतिनिधी दिनांक 27 जून 2026
गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी गंभीर हवामानाचा इशारा जारी केला असून, पुढील २४ तासांत जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी वादळ, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदी-नाले, ओढे आणि पूरप्रवण भागातील नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी. तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३ जुलैपर्यंत दररोज पावसाचा अंदाज
२७ जून ते ३ जुलै या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी, तर अनेक भागांत सर्वत्र दररोज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सलग पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे तसेच ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांसाठी महत्त्वाचा सुरक्षा सल्ला
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने नागरिकांना पुढील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
वादळ आणि विजांच्या वेळी शेतातील किंवा मोकळ्या जागेतील कामे तातडीने थांबवावीत.
सुरक्षित आणि पक्क्या इमारतीत आश्रय घ्यावा.
झाडाखाली, वीज खांबाजवळ किंवा कच्च्या भिंतीलगत उभे राहणे टाळावे. नदी, नाले किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे.
हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधण्याचे सांगितले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, गडचिरोली यांनी केले आहे.
