सिरोंचा प्रतिनिधी (विदर्भ न्यूज 24 दिनांक 11 फेब्रुवारी 2026
शिस्त, नियोजन आणि समन्वयाचा आदर्श नमुना**
सिरोंचा तालुक्यात सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील इंग्रजीच्या विषयाचा पेपर तिन्ही परीक्षा केंद्रांवर अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. कुठेही गोंधळ, गैरप्रकार किंवा तक्रारीचा एकही सूर उमटला नाही, हे विशेष.
तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सिरोंचा) आणि संत मानव दयाल शाळा (बामणी) या तिन्ही परीक्षा केंद्रांवर प्रशासनाने केलेले पूर्वनियोजन, वेळेचे काटेकोर पालन आणि यंत्रणांमधील समन्वय उठून दिसून आला. या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षण विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून सर्व केंद्रांची आणि संबंधित शाळांची प्रशंसा करण्यात आली.
जिल्हा परिषद हायस्कूल शाळा, सिरोंचा येथे असलेल्या परीक्षा केंद्र क्रमांक 0632 वर एकूण 286 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 283 विद्यार्थी उपस्थित होते. 03 विद्यार्थी गैरहजर राहिले, तर 01 दिव्यांग विद्यार्थ्याने परीक्षा दिली. या केंद्राची जबाबदारी केंद्र संचालक नरेंद्र रामकृष्ण मरस्कोल्हे यांनी सांभाळली. परीक्षेचे कामकाज L. V. बेज्जीनिवार आणि S. T. ठुम यांच्या उपस्थितीत अतिशय सुरळीत व नियमानुसार पार पडले.
तालुक्यातील इतर केंद्रांवरही चित्र तितकेच समाधानकारक होते. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 212 विद्यार्थ्यांनी, तर संत मानव दयाल शाळा, बामणी येथे 257 विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा पेपर लिहिला. तिन्ही केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत देखरेख, तसेच कडक पोलीस बंदोबस्त असल्यामुळे परीक्षा पूर्णतः शांततेत पार पडली.
या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामागे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सर्वांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळे बारावीच्या पहिल्याच पेपरला शिस्तीचा ठसा उमटला.
पुढील विषयांचे पेपरही याच पद्धतीने पार पडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून, विद्यार्थ्यांमध्येही आत्मविश्वासाचे वातावरण दिसून येत आहे.
— विदर्भ न्यूज 24
