गडचिरोली, विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 18 फेब्रुवारी 2020
केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) अन्वये राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षातून १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सशर्त सुट जाहीर करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्याशी सल्लामसलत करून सन २०२६ या वर्षाकरिता ठरावीक १५ दिवस सकाळी ०६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी जाहीर केली आहे.
रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यास निश्चित करण्यात आलेले दिवस पुढीलप्रमाणे आहेत : शिवजयंती (१९ फेब्रुवारी २०२६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल २०२६), ईद-ए-मिलाद (२६ ऑगस्ट २०२६), गणेश उत्सवासाठी चार दिवस (२०, २३, २४ व २५ सप्टेंबर २०२६), नवरात्र उत्सवासाठी चार दिवस (१९, २०, २१ व २२ ऑक्टोबर २०२६), दिवाळी लक्ष्मीपूजन (८ नोव्हेंबर २०२६), ख्रिसमस (२५ डिसेंबर २०२६) तसेच ३१ डिसेंबर २०२६ अशा एकूण १५ दिवसांचा समावेश आहे.
ही सुट श्रोत्यगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी लागू राहील. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० तसेच सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. जनहित याचिका क्र. १७३/२०१० मध्ये मा. उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक राहील.
जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार निश्चित ध्वनी मर्यादा व अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधित आयोजक व विभागांनी घ्यावी. राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही सवलत लागू राहणार नाही, असेही जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
0000
