गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 18 फेब्रुवारी 2026
दुर्गम आणि अतिदुर्गम भागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक मानली जाणारी जिल्हाभरातील एकूण ४४ माओवादी स्मारके आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत उध्वस्त करण्यात आली.
सी-६० पथक, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ तसेच जिल्ह्यातील विविध पोस्टे, उपपोस्टे व पोमके येथील एकूण १८ पथकांतील सुमारे ८०० जवानांनी जंगलातील विविध भागात एकाच वेळी शोधमोहीम राबवून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
गेल्या अनेक वर्षांपासून माओवाद्यांकडून जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी व आपले अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी जंगल परिसरात स्मारके उभारली जात होती. मात्र गडचिरोली पोलीस दलाने सातत्याने राबविलेल्या प्रभावी माओवादविरोधी कारवायांमुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून, सामान्य नागरिकांमधील भीतीही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ बिडीडीएस पथकांसह संयुक्त शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १५ पोलीस ठाणे, उपपोस्टे व पोमके हद्दीत माओवाद्यांनी उभारलेली एकूण ४४ स्मारके आढळून आली. बिडीडीएस पथकाकडून सखोल तपासणी केल्यानंतर ही सर्व स्मारके सुरक्षितपणे जमीनदोस्त करण्यात आली.
उध्वस्त करण्यात आलेल्या स्मारकांमध्ये एटापल्ली उपविभागातील १८, हेडरी उपविभागातील १७, भामरागड उपविभागातील ५, जिमलगट्टा उपविभागातील २, तर धानोरा व पेंढरी उपविभागातील प्रत्येकी १ स्मारकाचा समावेश आहे.
विशेषतः माओवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेनगुंडा, कयंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) या अतिदुर्गम गावांतील स्मारके नष्ट केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. ही स्मारके हिंसाचार आणि दहशतीची प्रतीके होती. ती नष्ट झाल्याने नागरिकांचा पोलीस व प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ही संपूर्ण कारवाई श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे व सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून, कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.”
मनोगत
दहशत ही फक्त बंदुकीतून येत नाही, ती आठवणींमधूनही पेरली जाते.
माओवाद्यांनी उभारलेली स्मारके ही केवळ दगडांची रचना नव्हती, तर सामान्य नागरिकांच्या मनात भीती रुजवण्याचे साधन होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात ही स्मारके म्हणजे माओवाद्यांचे मानसिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र आज त्या दहशतीवर थेट घाव घालण्यात आला आहे.
ही कारवाई म्हणजे फक्त स्मारके पाडणे नव्हे, तर भीतीचा इतिहासच संपवण्याची निर्णायक पायरी आहे.
— विदर्भ न्यूज 24
