गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 19 फेब्रुवारी 2026
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची ४४ स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (X) या समाजमाध्यमावरून गडचिरोली पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करत ही कारवाई केवळ भौतिक संरचना हटवण्यापुरती नसून, अनेक वर्षे जनतेच्या मनात घर केलेल्या भीतीवर लोकशाहीने मिळवलेला निर्णायक विजय असल्याचे नमूद केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, दुर्गम व अतिदुर्गम भागात माओवाद्यांकडून उभारण्यात आलेली ही स्मारके स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी उभी करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या सातत्यपूर्ण व ठाम माओवादविरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत लक्षणीय बदल झाला आहे. सुरक्षा कारवाया, प्रभावी आत्मसमर्पण धोरण, पायाभूत विकास प्रकल्प आणि स्थानिक नागरिकांचा वाढता विश्वास यामुळे जिल्ह्यातील वातावरण सकारात्मक दिशेने बदलत आहे.
या संयुक्त मोहिमेत गडचिरोली पोलीस दल, सी-६० कमांडो, सीआरपीएफ आणि विशेष पथकांच्या सुमारे ८०० जवानांनी नियोजनबद्ध शोध व तपासणी मोहीम राबवली. बीडीडीएस पथकाच्या सखोल तपासणीनंतर विविध जंगल परिसरातील ४४ स्मारके नेस्तनाबूत करण्यात आली. एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा, धानोरा आणि पेंढरी उपविभागांतील अतिसंवेदनशील भागांत ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.
ज्या ठिकाणी पूर्वी दहशतीचे प्रतीक उभे होते, त्या ठिकाणी आता प्रशासनावरील विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि विकासाची आशा दृढ होत असल्याचे चित्र आहे. ही कारवाई गडचिरोलीतील बदलत्या वास्तवाचे प्रतीक मानली जात असून, भीतीपासून विश्वासाकडे आणि हिंसेपासून विकासाकडे होत असलेल्या संक्रमणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले आहे.
