गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 7 मार्च 2026
गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई भरती 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026) अंतर्गत मैदानी (शारीरिक) चाचणी आज 7 मार्च रोजी यशस्वीपणे पूर्ण झाली. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर 11 फेब्रुवारीपासून सुरू असलेली ही चाचणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शक पद्धतीने पार पडली.
या भरती प्रक्रियेत 717 पोलीस शिपाई आणि 27 चालक पोलीस शिपाई पदांसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सहभाग घेतला. पोलीस शिपाई पदासाठी एकूण 23,791 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 13,674 पुरुष व 6,573 महिला उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. यातून 12,631 पुरुष आणि 5,743 महिला असे एकूण 18,374 उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.
तसेच चालक पोलीस शिपाईच्या 27 पदांसाठी 3,296 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2,347 पुरुष आणि 452 महिला उमेदवार चाचणीसाठी हजर झाले. यामधून 2,099 पुरुष आणि 324 महिला असे एकूण 2,423 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली. त्यामुळे दोन्ही भरती प्रक्रियेत मिळून 20,797 उमेदवारांनी मैदानी चाचणीत सहभाग घेतला.
दरम्यान चालक पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली वाहन कौशल्य चाचणी सध्या एमआयडीसी मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्या उपस्थितीत सुरू आहे. ही चाचणी 10 मार्च 2026 पर्यंत घेण्यात येणार असून एकूण 575 उमेदवारांची कौशल्य चाचणी होणार आहे.
भरती प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. उमेदवारांची उंची व छाती मोजणीसाठी PST Digital Physical Standard Test, तर 1600 मीटर धावणे (पुरुष), 800 मीटर धावणे (महिला) आणि 100 मीटर धावणे या चाचण्यांसाठी RFID तंत्रज्ञान वापरण्यात आले. तसेच गोळाफेक चाचणीसाठी Prism Technology चा वापर करण्यात आला.
मैदानी चाचणीदरम्यान उमेदवारांना कोणतीही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी मैदानावरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच उमेदवारांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
संपूर्ण भरती प्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी 69 पोलीस अधिकारी व 482 अंमलदार असे एकूण 551 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर या बंदोबस्तात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शहीद पांडू आलाम सभागृहात स्नेहभोजन (बडाखाना) आयोजित करण्यात आले.
या भरती प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकूल राज, सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप व रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान मैदानी चाचणीतील सर्व उमेदवारांचे गुण दुसऱ्या दिवशी गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आणि परीक्षेची तारीख पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
#GadchiroliPolice #PoliceBharti2026 #Gadchiroli #VidarbhaNews24 #PoliceRecruitment #MaharashtraPolice #GadchiroliNews
