गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 12 मार्च 2026
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून समितीचे संचालक अजय रामय्या कंकडालवार यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी ६ मार्च २०२६ रोजी आदेश जारी करत हा निर्णय घोषित केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच कंकडालवार यांच्यावर गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत कारवाईची शिफारस केली होती. समितीच्या १७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मासिक बैठकीत ठराव क्रमांक ५(२) मांडण्यात आला होता. या ठरावावर मतदान घेतल्यावर ठरावाच्या बाजूने १० तर विरोधात ४ मते पडली होती. बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला होता.
या ठरावानुसार कंकडालवार यांनी अधिकार नसताना समितीच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेषतः अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदीसारख्या बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे समितीने त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केली होती.
या प्रकरणात कंकडालवार यांच्याकडून सादर केलेले लेखी स्पष्टीकरण तसेच बाजार समितीने सादर केलेली कागदपत्रे तपासल्यानंतर उपनिबंधक जयसिंग के. ठाकूर यांनी अंतिम निर्णय दिला. त्यांनी नमूद केले की, संबंधित प्रकरणात गैरवर्तणूक सिद्ध होत असल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १७ आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समिती निवडणूक) नियम २०१७ मधील नियम १०(१)(के) नुसार अजय कंकडालवार हे अपात्र ठरतात.
त्या अनुषंगाने उपनिबंधकांनी आदेश देत अजय रामय्या कंकडालवार यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरीचे संचालक पद रद्द झाल्याचे जाहीर केले आहे.
या निर्णयामुळे अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात संचालक मंडळातील समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“विदर्भ न्यूज 24”
#Aheri #APMC #Gadchiroli #MarketCommittee #BreakingNews #VidarbhaNews24
