गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-16 मे 2026
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा देत गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्तपणे राबविलेल्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” मोहिमेत तब्बल ८ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सदस्य दर्जाच्या माओवाद्यांचा समावेश असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारुगोळा आणि ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या काही माओवाद्यांचा फोदेवाडा जंगल परिसरात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या चकमकीत एका सी-६० जवानाच्या हत्येत थेट सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. “गडचिरोलीतील माओवादी हालचाली जवळजवळ संपुष्टात आल्या असून पोलीस अभिलेखावरील एकही सक्रिय माओवादी शिल्लक नाही,” असा दावा पोलीस विभागाने केला आहे.
तेलंगणातून ४ माओवादी ताब्यात
१२ मे रोजी विशेष अभियान पथक, प्राणहिता यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथक तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील रुकमापूर रेल्वे स्थानकावर रवाना झाले. १३ मे रोजी स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी आपली ओळख पुढीलप्रमाणे सांगितली —
- जयराम मोंगे गावडे (पीपीसीएम, कंपनी क्र. १०)
- मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम (प्रभाकरचा अंगरक्षक)
- विजय ऊर्फ मंगडू हुंगा तामो (झोन टीडी सदस्य)
- रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी (कोअर दलम सदस्य)
या चौघांचा फोदेवाडा चकमकीतील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. पुढील चौकशीत त्यांनी फोदेवाडा जंगलात लपवून ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून .३०३ रायफल, दोन बारा बोअर बंदुका, जिवंत काडतुसे आणि माओवादी साहित्य जप्त केले.
कुमनारमध्ये डीव्हीसीएम राजू वेको आणि पत्नी अटकेत
१४ मे रोजी लाहेरी हद्दीतील मौजा कुमनार येथे माओवादी लपून बसल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच दोन माओवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जवानांनी गोळीबार न करता त्यांना जिवंत पकडले.
अटक करण्यात आलेले माओवादी —
- राजू ऊर्फ मंगडू मंगलू वेको (डीव्हीसीएम, कंपनी क्र. १०)
- जनी ऊर्फ नगी उंगाल येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. १०)
त्यांच्याकडून एके-४७ रायफल, .३०३ रायफल, बारा बोअर बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
यानंतर झालेल्या चौकशीत गुंडेनूर जंगल परिसरात मोठा शस्त्रसाठा लपविल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी १६ मे रोजी जंगल परिसरात धाड टाकून १ एसएलआर एलएमजी, १ इन्सास एलएमजी, ३ एके-४७ रायफल, ३ एसएलआर रायफल, २ इन्सास रायफल, .३०३ रायफल, बीजीएल लॉन्चर, ३५८ जिवंत काडतुसे आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला. याच ठिकाणावरून तब्बल ६३ लाख ८४ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.
नैताळा येथे महिला माओवादी जेरबंद
याच दिवशी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या नेतृत्वाखाली नैताळा गावात शोधमोहीम सुरू असताना काही माओवादी घरांचा आडोसा घेऊन लपल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाठलाग करून दोन महिला माओवाद्यांना जेरबंद केले.
अटक आरोपी —
- ज्योती ऊर्फ अकिला ऊर्फ समिता पोटावी (डीव्हीसीएम)
- आमती ऊर्फ आयती ऊर्फ संध्या इडमा पोडीयाम (सदस्य, कंपनी क्र. १०)
त्यांच्याकडून एसएलआर रायफल, बारा बोअर बंदूक, सिंगल शॉट रायफल जप्त करण्यात आली. चौकशीनंतर नैताळा जंगल परिसरात शोधमोहीम राबवून इन्सास रायफल, .३०३ रायफल, ८ बारा बोअर रायफल, डेटोनेटर, बीजीएल सेल, मॅग्जिन आणि मोठा दारुगोळा जप्त करण्यात आला.
तब्बल ५१ अग्निशस्त्रे जप्त
या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी एकूण ५१ अग्निशस्त्रे जप्त केली असून त्यामध्ये —
- २ एलएमजी रायफल
- ४ एके-४७ रायफल
- ४ एसएलआर रायफल
- ३ इन्सास रायफल
- .३०३ रायफल
- बारा बोअर बंदुका
- बीजीएल लॉन्चर
- मोठ्या प्रमाणावर काडतुसे व स्फोटक साहित्य
यांचा समावेश आहे.
६४ लाखांचे बक्षीस असलेले माओवादी जाळ्यात
अटक करण्यात आलेल्या आठही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने मिळून ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामध्ये —
- राजू वेको – १६ लाख
- ज्योती पोटावी – १६ लाख
- जनी येमला – ८ लाख
- जयराम गावडे – ८ लाख
- उर्वरित चार माओवादी – प्रत्येकी ४ लाख
असे बक्षीस घोषित होते.
“गडचिरोलीत सक्रिय माओवादी शिल्लक नाही”
या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी नेटवर्क जवळपास उद्ध्वस्त झाल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे. अभिलेखावरील उर्वरित सहा माओवाद्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून एक महिला माओवादी मोनी मडावी हिने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे “गडचिरोली पोलीस अभिलेखावर आता एकही सक्रिय माओवादी शिल्लक नाही,” असा दावा अधिकाऱ्यांनी केला.
ही मोहीम विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक श्री. योगेश कुमार, सीआरपीएफचे डीआयजी श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक आणि सी-६० जवानांनी यशस्वीपणे पार पाडली.
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश
“गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कारवायांना पूर्णविराम देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध पद्धतीने ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ राबविले. या कारवाईत ८ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. फोदेवाडा चकमकीत शहीद झालेल्या जवानाच्या हत्येत सहभागी आरोपींना पकडण्यात आम्हाला यश आले आहे. जिल्ह्यातील उर्वरित माओवादी नेटवर्क जवळपास उद्ध्वस्त झाले असून गडचिरोलीला नक्षलमुक्त करण्याच्या दिशेने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आत्मसमर्पण करू इच्छिणाऱ्या युवकांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन देखील आम्ही करत आहोत.”
