गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 17 मे 2026
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) च्या आवाहनानुसार देशभरातील तसेच महाराष्ट्रातील औषध विक्रेत्यांनी ऑनलाइन औषध विक्री, ई-फार्मसी आणि केंद्र सरकारच्या काही धोरणांविरोधात २० मे २०२६ रोजी “अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद” पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून या आंदोलनामुळे औषध व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने केंद्र सरकारकडे अनेक वेळा निवेदने देऊन ऑनलाइन औषध विक्री थांबविण्याची मागणी केली होती. मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर देशव्यापी बंदचे हत्यार उपसण्यात आले आहे. संघटनेच्या मते, ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांच्या आरोग्याशीही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
संघटनेने केंद्र सरकारच्या GSR 817, दिनांक २८ ऑगस्ट २०१८ तसेच GSR 220(E), दिनांक २६ मार्च २०२० या धोरणांवर आक्षेप घेतला आहे. या नियमांमुळे ई-फार्मसी आणि ऑनलाइन औषध विक्रीला चालना मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, वैद्यकीय सल्ल्याशिवाय ऑनलाइन माध्यमातून औषधे उपलब्ध होत असल्याने चुकीच्या औषधांचा वापर वाढण्याची भीती आहे. तसेच ग्रामीण आणि छोट्या शहरांतील हजारो मेडिकल स्टोअर्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच देशातील आणि राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला असून आवश्यक सेवा व आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांना औषध खरेदीसाठी काही प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
औषध विक्रेत्यांच्या या आंदोलनाकडे आता शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण औषध व्यवसायाचे लक्ष लागले आहे.
