गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-27जुन 2026
गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी भामरागड येथील गुणवंत खेळाडू कु. प्रियांका लालसू ओक्सा यांनी केली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये क्रीडा कोटा-२०२५ अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी त्यांची निवड झाली आहे. दुर्गम आदिवासी भागातील एका खेळाडूने मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा दलात स्थान मिळविल्याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
प्रियांकाच्या या यशामागे लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन अंतर्गत कार्यरत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे व्यावसायिक प्रशिक्षण, आवश्यक प्रायोजकत्व आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. ग्रामीण व आदिवासी भागातील क्रीडा प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी गेल्या काही वर्षांपासून प्रभावीपणे कार्यरत असून, प्रियांकाचे यश हे त्या प्रयत्नांचे आणखी एक यशस्वी उदाहरण मानले जात आहे.
प्रियांकाने आपल्या क्रीडा कारकिर्दीत सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. तिच्या या यशामुळे केवळ तिचे कुटुंबच नव्हे, तर भामरागड परिसर, संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचेही नाव उज्ज्वल झाले आहे.
बीएसएफमध्ये झालेली ही निवड ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. योग्य प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे प्रियांकाने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे क्रीडेला करिअर म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा अनेक तरुणांना मिळणार आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी प्रियांकाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “प्रियांकाचे यश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिची मेहनत, शिस्त आणि समर्पणामुळेच तिला हे यश मिळाले आहे. तिचा प्रवास गडचिरोलीतील अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल. ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि युवकांना क्रीडेद्वारे त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी लॉयड्स मेटल्स सदैव कटिबद्ध राहील.”
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीनेही प्रियांकाचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिच्या देशसेवेतील उज्ज्वल आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांका लालसू ओक्सा यांचे हे यश तळागाळातील क्रीडा विकासासाठी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित असून, ग्रामीण युवक-युवतींना राष्ट्रीय स्तरावर यशाची दारे खुली होऊ शकतात, याचा विश्वास अधिक दृढ करणारे ठरले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
