अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक : 18 मे 2026
गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करत अहेरी पोलिसांनी पुन्हा एकदा आपला धडाका दाखवून दिला आहे. माननीय पोलीस अधीक्षक एम. रमेश, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या थेट देखरेखीखाली आज मोठी कायदेशीर नष्टीकरण मोहीम राबविण्यात आली.
सन २०२५ मध्ये दाखल विविध आठ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मानवी आरोग्यास अत्यंत घातक सुगंधी तंबाखू तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अवैध बीटी बियाणांचा मोठा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार आज अखेर पूर्णतः नष्ट करण्यात आला. दोन पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली.
या कारवाईत तब्बल ११ लाख ९० हजार १८० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि ९ लाख ६२ हजार ९६२ रुपये किमतीचे अवैध बीटी बियाणे नष्ट करण्यात आले. एकूण २१ लाख ५३ हजार १४२ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार भस्मसात करण्यात आला.
अवैध सुगंधी तंबाखूमुळे युवक आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असताना, दुसरीकडे अवैध बीटी बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अहेरी पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सुरू असलेल्या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. “कायद्यापुढे कुणीही मोठे नाही,” हा स्पष्ट संदेश अहेरी पोलिसांनी या कारवाईतून दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
या पारदर्शक आणि कठोर कारवाईबद्दल अहेरी पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच पद्धतीने अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून मिळत आहेत.
— विदर्भ न्यूज 24
