गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-01सप्टेंबर 2026
सिरोंचा वनविभागातील आसरेल्ली वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक विनोद रामजी गोल्लेवार यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४(१) अन्वये त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला.
निलंबनाच्या आदेशानुसार, गोल्लेवार यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजिले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग यांच्या कार्यालयात राहणार असून, पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
निलंबन काळात शासनाच्या नियमानुसार त्यांना निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. मात्र, या कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या अटीचा भंग झाल्यास संबंधित कृती शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरणार असून निर्वाह भत्त्यावरही परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, उपवनसंरक्षक, सिरोंचा वनविभाग यांना आदेशाची अंमलबजावणी करून तो संबंधित कर्मचाऱ्यास तातडीने बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गोल्लेवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या चौकशीनंतर संबंधित प्रकरणातील दोषारोपांचे प्रारूप तयार करून मुख्य वनसंरक्षक कार्यालयास सादर करण्याचेही निर्देश आहेत. त्यामुळे गोल्लेवार यांच्या निलंबनानंतर आता विभागीय चौकशीत नेमके कोणते तथ्य समोर येते, याकडे वन विभागासह परिसराचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अधिकृत आदेशात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट असले तरी त्यामागील विशिष्ट आरोप किंवा दोषारोप अद्याप अंतिम स्वरूपात जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत कोणताही आरोप सिद्ध झाल्याचे मानणे योग्य ठरणार नाही.
