गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :-31 ऑगस्ट 2026
आईच्या कुशीत नुकतेच आलेले तीन जीव… मुदतपूर्व जन्मामुळे तिघांनाही एनआयसीयूमध्ये उपचार सुरू… त्यापैकी एका चिमुकलीची प्रकृती अचानक खालावली आणि डॉक्टरांनी तातडीने रक्ताची गरज असल्याचे सांगितले. मात्र, आवश्यक रक्तगटाचा साठा रुग्णालयात उपलब्ध नव्हता. अशा वेळी मदतीसाठी पुढे आले ते गडचिरोली पोलीस. कर्तव्य बजावताना माणुसकीची नाळही जपणाऱ्या पोलिसांनी स्वतः रक्तदान करून एका नवजात चिमुकलीला जीवनाची नवी आशा दिली.
एटापल्ली तालुक्यातील ३२ वर्षीय शांता गावडे यांनी दि. २२ ऑगस्ट रोजी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात तिळ्या बाळांना जन्म दिला. मुदतपूर्व जन्म आणि कमी वजनामुळे तिन्ही नवजात बाळांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. सुरुवातीला तिन्ही बाळांची प्रकृती स्थिर होती; मात्र दि. २८ ऑगस्ट रोजी एका नवजात बालिकेची प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी झाली. तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने डॉक्टरांनी तातडीने ‘दृअ’ रक्तगटाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
मात्र, त्यावेळी रुग्णालयात आवश्यक रक्त उपलब्ध नसल्याने मोठे संकट निर्माण झाले. वेळ न दवडता रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेने तातडीने पुढाकार घेतला.
गडचिरोली रक्त केंद्राच्या सहकार्याने आवश्यक रक्त उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याचवेळी ऑपरेशन सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि नागरी कृती शाखेतील महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांनी कोणताही विलंब न करता स्वेच्छेने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
या दोघांच्या रक्तदानामुळे नवजात बालिकेसाठी आवश्यक ‘दृअ’ रक्तगटाच्या दोन बॅग उपलब्ध झाल्या. वेळेत रक्त मिळाल्याने बालिकेच्या उपचारांना मोठी मदत झाली आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
एका बाजूला गणवेशातील कर्तव्य, तर दुसऱ्या बाजूला एका अनोळखी चिमुकलीचे जीवन… या दोन्ही जबाबदाऱ्या पोलिसांनी तितक्याच संवेदनशीलतेने पार पाडल्या. रक्तदान करणाऱ्या या पोलीस अधिकारी व महिला अंमलदारांनी केवळ रक्त दिले नाही, तर त्या चिमुकलीच्या आयुष्याला आशेचे दोन थेंब दिले.
या मदतीबद्दल नवजात बालिकेच्या आई-वडिलांसह रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही संकटकाळी तत्परतेने रक्तदान करणारे पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांचे कौतुक केले.
गडचिरोली पोलिसांची ही कृती पुन्हा एकदा सांगून जाते—गणवेश केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी नसतो; गरज पडली तर तो माणुसकीचा हात बनूनही पुढे येतो.
