गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-31 अगस्ट 2026
हातात बंदूक घेऊन जंगलात भटकणारे तेच चेहरे… कधी हिंसाचाराच्या सावटाखाली जगलेले, तर कधी कुटुंबापासून दूर गेलेले आयुष्य. मात्र, आज त्यांच्या हातात बंदूक नव्हती; होती ती नव्या आयुष्याची आशा. हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना सोमवारी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भावनिक निरोप देत त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीविरोधात सुरू असलेल्या अभियानांसोबतच शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे अनेक माओवादी सदस्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या या प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल ८१९ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित सदस्यांना केवळ शरणागतीनंतर सुरक्षितता देणे एवढ्यावर न थांबता त्यांना पुन्हा सामान्य जीवन जगता यावे, यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना आता त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविण्यात आले. कधीकाळी जंगलातील बंदुकीच्या सावलीत गेलेले आयुष्य मागे सोडून आपल्या कुटुंबीयांमध्ये, आपल्या माणसांमध्ये आणि समाजात पुन्हा नव्याने जगण्याची संधी त्यांना मिळत आहे. त्यामुळे हा निरोप केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर एका जुन्या आयुष्याला मागे सोडून नव्या आयुष्याकडे टाकलेले पाऊल होते.
आत्मसमर्पणानंतर या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आर्थिक सहाय्य, शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार तसेच विविध कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मदत करण्यात आली. आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत बाबी उपलब्ध करून देत त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी देण्यात आली.
या प्रक्रियेला गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’मुळे व्यापक स्वरूप मिळाले. पुनर्वसन म्हणजे केवळ कागदोपत्री प्रक्रिया न राहता आत्मसमर्पित सदस्यांना आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आरोग्य, मानसिक आधार, कौशल्य विकास आणि सामाजिक समावेशनावरही लक्ष देण्यात आले. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे घेण्यात आली. आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी ध्यान व योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
ज्यांच्या आयुष्यात कधीकाळी बंदुकीचा आवाज होता, त्यांच्या आयुष्यात आता संसाराची चाहूल लागली आहे. ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून देण्यात आले. तर ८८ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमातून आत्मसमर्पित सदस्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा मार्ग मिळत आहे.
निरोप समारंभाच्या वेळी आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंसाचाराचे जीवन सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलीस दलाकडून मिळालेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. पुनर्वसनाच्या काळात मिळालेली मदत, प्रशिक्षण आणि नव्याने आयुष्य उभारण्यासाठी मिळालेल्या संधीमुळे आपल्या भविष्यातील वाटचालीबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आशावाद दिसून आला.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांनी मिळालेल्या संधींचा उपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे, असे सांगितले. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतलेल्या सदस्यांचे पुनर्वसन ही केवळ प्रशासनाची प्रक्रिया नसून, हिंसाचारातून शांततेकडे आणि जंगलातील जीवनातून कुटुंबाच्या उबेकडे परतण्याची मानवी कहाणी आहे. ५० आत्मसमर्पित सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितपणे रवाना करण्यात आलेला हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात ठरला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक सागर भामरे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनिल उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.
