चामोर्शी तालुका प्रतिनिधी दिनांक: 29 ऑगस्ट 2026
स्थानिक निशिगंधा इंग्लिश स्कूलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कपिस मोरेश्वर कुनघाडकर याने आपल्या बुद्धिमत्तेची, सादरीकरण कौशल्याची आणि अभ्यासू वृत्तीची छाप पाडत जिल्हास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा–२०२६ मधील भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक आणि विज्ञान क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिल्हास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी कमलताई मुनघाटे हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यंदाच्या विज्ञान मेळाव्याचा विषय ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र–२०४७ : भवितव्य आणि आव्हाने’ असा होता. भविष्यातील भारताच्या ऊर्जा गरजा, उपलब्ध संसाधने, ऊर्जा निर्मितीतील बदल, पर्यावरणीय आव्हाने तसेच शाश्वत ऊर्जेची गरज यांसारख्या विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
या स्पर्धेत कपिस कुनघाडकर याने विषयाचा सखोल अभ्यास करून PPT सादरीकरणासोबत संबंधित विषयावर आधारित विविध मॉडेल्स तयार केले. विशेष म्हणजे त्याने संपूर्ण विषयाचे प्रभावीपणे इंग्रजी भाषेत सादरीकरण करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्व, विषयाची अचूक मांडणी, प्रभावी सादरीकरण आणि विज्ञानविषयक संकल्पनांचे सोप्या पद्धतीने केलेले स्पष्टीकरण यामुळे त्याला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.
स्पर्धेतील यशानंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कपिस कुनघाडकर याचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कपिसच्या या यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाचे सचिव विवेक भाऊ सहारे, कोषाध्यक्ष वक्तुजी उंदीरवाडे, सदस्य माणिक साखरे, तसेच निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका वालदे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
कपिस कुनघाडकरच्या या यशामुळे चामोर्शी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचीही मान उंचावली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची कमतरता नसल्याचे या यशाने अधोरेखित केले आहे.
