गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-28 ऑगस्ट 2026
एटापल्ली तालुक्यातील कोईदुळ येथील गरोदर मातेच्या आरोग्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि मार्गातील नाल्याला आलेले पाणी यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असतानाही आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत गरोदर मातेला प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले. त्यानंतर तिची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी हेड्री येथील एलकेएएम रुग्णालयात सुरक्षितरीत्या संदर्भित करण्यात आले आहे.
कोईदुळ येथील रहिवासी श्रीमती छाया सुरेश नेताम (वय २६ वर्षे) यांना २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. याची माहिती सकाळी ७.४० वाजता स्थानिक आशा स्वयंसेविका श्रीमती निर्मला नरोटे यांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी विलंब न करता आरोग्यसेविका श्रीमती चंद्रकला सिडाम (ANM) यांना माहिती दिली.
माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली. आरोग्यसेविकांनी तात्काळ रुग्णवाहिका चालकांशी संपर्क साधून रुग्णवाहिका गावाच्या दिशेने रवाना केली. सकाळी ८ वाजता रुग्णवाहिकेने कोईदुळच्या दिशेने प्रस्थान केले. मात्र, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मार्गातील नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे रुग्णवाहिका सकाळी ८.३० वाजता नाल्यापर्यंतच पोहोचू शकली.
यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वय साधला. नाला ओलांडण्यासाठी गरोदर मातेला फोल्डेबल स्ट्रेचरच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाहेर आणण्यात आले. सकाळी ९ वाजता तिला नाल्याच्या पलीकडे उभी असलेल्या रुग्णवाहिकेत दाखल करण्यात आले. प्रतिकूल हवामान, पूरपरिस्थिती आणि भौगोलिक अडचणी असतानाही स्थानिक नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मातेपर्यंत रुग्णवाहिका सेवा पोहोचविण्यात आली.
त्यानंतर सकाळी ९.३० वाजता गरोदर मातेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम डांगे यांनी तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान मातेचे हिमोग्लोबिन अवघे ५.६ ग्रॅम असल्याचे आढळून आले. हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने तिच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक सक्षम वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
मातेची सुरक्षितता आणि पुढील उपचारांचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळी ११.३० वाजता तिला पुढील उपचारासाठी एलकेएएम रुग्णालय, हेड्री येथे संदर्भित करण्यात आले. तेथे तिला दाखल करण्यात आले असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पुराच्या परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेची तत्परता
एटापल्ली तालुक्यातील दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरोदर मातेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. मात्र, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, रुग्णवाहिका चालक, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या समन्वयातून ही मदत वेळेत उपलब्ध करून देण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यापासून रुग्णवाहिका रवाना करणे, पूरग्रस्त नाल्यापर्यंत पोहोचणे, स्ट्रेचरच्या सहाय्याने मातेला सुरक्षितपणे रुग्णवाहिकेपर्यंत आणणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्यानंतर पुढील उपचारासाठी संदर्भित करणे, ही संपूर्ण प्रक्रिया तातडीने पार पडल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले की, भौगोलिक अडचणी आणि पूरपरिस्थिती असतानाही आरोग्य यंत्रणेने कोणतीही दिरंगाई न करता संपर्क, समन्वय आणि उपचाराची प्रक्रिया पूर्ण केली. मातेची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक वैद्यकीय पावले उचलण्यात आली असून पुढील उपचारासाठी तिला सुरक्षितरीत्या संदर्भित करण्यात आले आहे.
