गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक :-28 ऑगस्ट 2026
माओवादाच्या हिंसक वाटेचा त्याग करून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत गडचिरोली पोलीस दलाने रक्षाबंधनाचा सण साजरा करून माणुसकी, आपुलकी आणि विश्वासाचा अनोखा संदेश दिला. नवजीवन वसाहत, नवेगाव गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात तब्बल ७० आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्य सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी तसेच सी-६० जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी लढ्याला यश मिळत असताना हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक माओवादी सदस्यांनी शस्त्रांचा मार्ग सोडत आत्मसमर्पण केले आहे. वरिष्ठ माओवादी नेत्यांसह जहाल माओवादी सदस्यांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजना २००५ अंतर्गत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आतापर्यंत एकूण ८१९ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि पोलीस दलाबद्दल विश्वासाचे नाते दृढ व्हावे, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत रक्षाबंधनाचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांनी नवजीवन वसाहतीला भेट दिली. त्यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आत्मसमर्पित महिलांनी पोलीस अधिकारी आणि सी-६० जवानांच्या मनगटावर राखी बांधली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही आत्मसमर्पित महिलांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांना भेटवस्तू दिल्या. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. हिंसाचाराचा मार्ग सोडून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून आवश्यक ते सहकार्य सातत्याने केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रक्षाबंधनाच्या या उपक्रमामुळे पोलीस आणि आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांमधील नाते केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित न राहता विश्वास आणि माणुसकीच्या भावनेने अधिक दृढ होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. एकेकाळी बंदुकीच्या सावटाखाली जीवन जगलेल्या महिलांच्या हातातील राखीचा धागा आणि पोलिसांच्या मनगटावर बांधलेली ती राखी हा बदलत्या गडचिरोलीचा सकारात्मक संदेश देणारा क्षण ठरला.
दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि सहायक पोलीस अधीक्षक गडचिरोली अनिकेत हिरडे यांनी पोलीस स्टेशन गडचिरोली, चातगाव तसेच पोलीस मदत केंद्र गोडलवाही येथे भेट देऊन तेथील महिला पोलीस अधिकारी, अंमलदार आणि शालेय विद्यार्थीनींसोबतही रक्षाबंधन सण साजरा केला.
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील विद्यार्थिनींनीही विशेष उपक्रम राबविला. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, भरारी प्रतिष्ठान, पुणे तसेच मुंबई शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी गडचिरोली पोलिसांसाठी राख्या पाठविल्या. या राख्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी दुर्गम आणि संवेदनशील भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय सिंह, पोलीस निरीक्षक सीटीसी किटीळी समाधान चव्हाण, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली अरुण फेगडे, पोलीस निरीक्षक मो.प.वि. गडचिरोली विवेक पांडव यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
माओवादाच्या काळोख्या वाटेवरून बाहेर पडून नवजीवनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांच्या मनगटातील राखी आणि पोलिसांच्या हातातील तोच धागा गडचिरोलीतील बदलाची नवी कहाणी सांगणारा ठरला. हिंसेऐवजी विश्वास, बंदुकीऐवजी राखी आणि संघर्षाऐवजी माणुसकीचा संदेश देणारे हे रक्षाबंधन गडचिरोलीसाठी निश्चितच वेगळे आणि भावनिक ठरले.
