गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक 30 ऑगस्ट 2026
गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि गैरकायदेशीर हालचालींविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ३२ गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने व तीन मोबाईल फोन असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ३२ जनावरांपैकी चार गायी व दोन बैल अशी एकूण सहा जनावरे मृतावस्थेत आढळून आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, या प्रकरणातील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांसह गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुरखेडा येथील शेहजाद शेख व गेवर्धा येथील जमीर कुरेशी हे आपल्या ताब्यातील आयसर वाहन क्रमांक एमएच ०४ जीआर ०३८४ मधून ठाणेगाव आरमोरी टी-पॉईंट मार्गे मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणार आहेत.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांच्या पथकाने ठाणेगाव आरमोरी टी-पॉईंटजवळ सापळा रचून पाळत ठेवली. काही वेळाने ठाणेगाव आरमोरी रोडवर दोन वाहने पायलटिंग करताना आणि त्यांच्या मागून संशयित आयसर वाहन येताना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करून आयसर वाहन थांबविले. त्यावेळी वाहनातील दोन्ही इसमांनी वाहनातून उतरून जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यापैकी प्रणय समीर जांभुळकर, वय २० वर्षे, रा. आंधळी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याला ताब्यात घेतले.
त्यानंतर पोलिसांनी आयसर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले. दरम्यान, समोरील टी-पॉईंटवर तैनात असलेल्या आरमोरी पोलिसांच्या पथकाने पायलटिंग करणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र क्रेटा वाहनाचा चालक पोलिसांचा इशारा धुडकावून वाहन न थांबविता तेथून पसार झाला.
यानंतर क्रेटाच्या पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्रमांक सीजी १० एएम ८४१५ या वाहनालाही पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर वाहनातील तीन इसमांनी वाहन थांबवून जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिन्ही इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे शेहबाज सलाम शेख, वय ३१ वर्षे, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली, शोहेब फारुक शेख, वय २७ वर्षे आणि शेख आकिब नासीर शेख, दोघेही रा. जाफरनगर, नागपूर अशी सांगितली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, पुढे पळून गेलेल्या काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनामध्ये असलेले शहजाद शेख, रा. कुरखेडा व जमील कुरेशी, रा. गेवर्धा, जि. गडचिरोली यांच्या सांगण्यावरून गोवंशीय जनावरांनी भरलेल्या आयसर वाहनाची पायलटिंग करत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त वाहनांची तपासणी केली असता आयसर वाहनामध्ये २६ गायी आणि ६ बैल असे एकूण ३२ गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत ५ लाख ९५ हजार रुपये असून, आयसर वाहनाची अंदाजे किंमत १० लाख रुपये आणि स्विफ्ट डिझायर वाहनाची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे. याशिवाय तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. अशा प्रकारे या कारवाईत एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ३२ पैकी चार गायी आणि दोन बैल अशी एकूण सहा जनावरे मृत असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित जनावरांची योग्य ती काळजी घेण्यासाठी संबंधित कार्यवाही करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ३८०/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ (१) (अ), ११ (१) (ड), ११ (१) (इ), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५ (अ), ५ (ब), ९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३ (५), ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात शेहबाज सलाम शेख, शोहेब फारुक शेख, शेख आकिब नासीर शेख आणि प्रणय समीर जांभुळकर या चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणातील शहजाद शेख, जमील कुरेशी तसेच आयसर वाहनाचा अज्ञात चालक हे पाहिजे आरोपी असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कांबळे, पोलीस ठाणे आरमोरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस हवालदार सुधाकर दंडीकवार, पोलीस अंमलदार बोईना, चापोअं लोणारे तसेच आरमोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोलीस हवालदार मेश्राम आणि पोलीस अंमलदार तांगडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात अशा गैरकायदेशीर प्रकारांना थारा दिला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला आहे.
— विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
