असरअल्ली / सिरोंचा प्रतिनिधी दिनांक 29 ऑगस्ट 2026
इंद्रावती नदीच्या पात्रातून होणाऱ्या बेकायदेशीर सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी सिरोंचा वनविभागाने मध्यरात्री धडक कारवाई करत तस्करांचा डाव उधळून लावला. महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील बोनतामाडगू कॅम्प परिसरात वन पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत तस्करांनी नदीपात्रात सोडून दिलेले तब्बल २७ सागवानी नग जप्त करण्यात आले असून त्याचे प्रमाण अंदाजे २ घनमीटर असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
असरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत इंद्रावती नदीच्या पात्रात बोनतामाडगू कॅम्प कार्यरत असून या कॅम्पच्या माध्यमातून नदीपात्रातून होणाऱ्या सागवान तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने गस्त आणि निगराणी केली जाते. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास असरअल्ली वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी अजिनाथ पानगे यांना गुप्त माहिती मिळाली की, आसपासच्या गावांमधून सागवान लाकडे नदीपात्रात टाकून त्याची छत्तीसगडच्या दिशेने तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गुप्त माहिती मिळताच वनविभागाने विलंब न करता कारवाईची तयारी केली. वनरक्षक तसेच वन संरक्षण मजुरांच्या मदतीने महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदी परिसरात वन पथक तैनात करण्यात आले. नदीचे पात्र या भागात सुमारे ३०० ते ४०० मीटर रुंद असल्याने तस्करांना पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी वन पथकाने नदीच्या दोन्ही बाजूंनी घेराबंदी केली.
रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास नदीपात्रात संशयास्पद हालचाल जाणवताच वन पथकाने कारवाई सुरू केली. वनविभागाची चाहूल लागताच तस्करांनी अंधाराचा आणि इंद्रावती नदीच्या वेगवान प्रवाहाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, तस्करांना त्यांच्यासोबत सागवान लाकूड घेऊन जाता आले नाही. वन पथकाने नदीपात्राची तपासणी करून तस्करांनी सोडून दिलेले २७ सागवानी नग ताब्यात घेतले.
रात्रीच्या अंधारात तसेच नदीचा वेगवान प्रवाह असतानाही वन कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणातील सागवान तस्करीचा प्रयत्न उधळून लावण्यात यश आले. या कारवाईनंतर सीमावर्ती भागात वनसंपत्तीची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणातील फरार तस्करांचा वनविभागाकडून शोध सुरू असून, संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच इंद्रावती नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागातील वनविभागाची गस्त आणि निगराणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
ही धाडसी कारवाई सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आणि उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली असरअल्ली वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी अजिनाथ पानगे, वनरक्षक, वन संरक्षण मजूर तसेच बोनतामाडगू कॅम्पच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. वनविभागाच्या या तत्पर कारवाईमुळे इंद्रावती नदीपात्रातून होणाऱ्या सागवान तस्करीला मोठा धक्का बसला असून, वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी विभागाची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
